अमळनेर : तालुक्यातील मांडळ गावात पांझरा नदीकाठी धाड टाकून राज्य उत्पादन शुल्क विभागाने गावठी हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त केले. यावेळी पथकाने ३६ हजार ३०० रुपयांचे साहित्य आणि गावठी दारूचे रसायन जागेवरच नष्ट केले. तसेच संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील मांडळ गावातील पांझरा नदीकाठी गावठी हातभट्टी दारूचे अड्डे असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास दुय्यम निरीक्षक आर. पी. दांगट व शशिकांत पाटील, दिनेश पाटील आदींनी नदी काठावर फिरून शोध घेतला. हातभट्टीवर दारु तयार करुन गाळत असतांना पथक पोहचले. त्यावेळी हातभट्टी चालकांनी पळ काढला. यात पथकाला आढळलेले १३०० लिटर रसायन व २० लिटर गावठी दारु, ५० लिटर क्षमतेचे २७ पाण्याचे प्लास्टिक ड्रम, चार लोखंडी बॉयलर असा एकूण ३६ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. तो जागीच नष्ट करून टाक्याही नष्ट केल्या. मुंबई दारूबंदी अधिनियम १९४९ चे सुधारित अधिनियम २००५ चे कलम ६५ फ ई अन्वये कारवाई करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने दिली.