‘स्पर्धा परीक्षा’ केवळ नोकरी मिळविण्याचे साधन नसून सर्वांगीण विकास करण्याचं माध्यम : प्रा.गोपाल दर्जी

अमळनेर : जर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी व्हायचे असेल तर सुरक्षिततेचा परीघ ओलांडावा लागेल. ‘स्पर्धा परीक्षा’ केवळ नोकरी मिळविण्याचे साधन नसून सर्वांगीण विकास करण्याचं माध्यम आहे’ असे मत दर्जी फाउंडेशन, जळगाव चे संस्थापक प्रा.गोपाल दर्जी यांनी व्यक्त केले. येथील आय.एम.ए.हॉल, जी.एस.हायस्कूल येथे सुरु असलेल्या प्रेरणादीप व्याख्यान मालेचे दुसरे पुष्प गुंफतांना ‘स्पर्धापरीक्षा व युवकांपुढील आव्हाने’ या विषयावर ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमळनेरचे नवनिर्वाचित आमदार अनिल पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, जि. प.सदस्या जयश्रीताई पाटील, ग.स.पतपेढीच्या संचालिका विद्यादेवी कदम होत्या.
प्रा.दर्जी पुढे म्हणालेे की, ईच्छाशक्तीने काम केलं तर स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून अधिकारी होता येतं, त्यात कोणतीही परिस्थिती आड येत नाही. झापड लावलेल्या घोड्यासारखे धावले तर इच्छित स्थळी पोहचता येेते. पालकांनी विशेषतः आईने मुलांशी शैक्षणिक संवाद साधला पाहिजे. मुलांना संघर्षात जगायला शिकवले पाहिजे. स्पर्धा परीक्षा म्हणजे केवळ नोकरी मिळविण्याचे साधन नसून सर्वांगीण विकास करण्याचं माध्यम म्हणून त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. धडपडणाऱ्या तरुणांना मदत करणं हे आपलं सामाजिक दायित्व असते. जीवनात महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक योगदान अवलंबिले पाहिजे. गणिताचा अभ्यास कृप्त्यांच्या माध्यमातून केल्यास फार सोपा आहे. कॉलेजची मुलं ही कलाकार असतात.
अध्यक्षीय मनोगतात आमदार अनिल पाटील म्हणाले की, ‘पालकांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक विचार दिले पाहिजे. विद्यार्थ्यांनी जीवनात प्रथम आपले ध्येय ठरवले पाहिजे तरच यश संपादन करता येते. स्पर्धेच्या युगात जगायचे असेल तर नियोजन करणे गरजेचे आहे. शालांत जीवनात मला लाल दिव्याच्या गाडीत फिरावंंस वाटायचं.
याप्रसंगी तालुक्यातील पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा वक्त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात, विद्यादेवी दामोदर पाटील, प्रकाश भिका पाटील, संजय भगवान पाटील, सतिलाल गंगाराम बोरसे, सुनिल नारायण मोरे, अर्चना मणिलाल बागुल, रणजित शिंदे, गायत्री साहेबराव देसले, भुषण सुरेश महाले, पांडुरंग विक्रम पाटील – आंबापिंप्री, अश्विन लिलाचंद पाटील यांच्यासह मारवड जि.प.मुलींची शाळा व जवखेडा जि.प.शाळा या दोन आदर्श शाळांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सानेगुरुजी शैक्षणिक विचारमंचचे संस्थापक सदस्य दत्ता सोनवणे यांनी तर वक्त्यांचा परिचय प्रेमराज पवार यांनी करून दिला. सूत्रसंचालन रवींद्र पाटील यांनी तर आभार प्रदर्शन अशोक पाटील यांनी केले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!