
अमळनेर : नाशिकच्या प्रसिद्ध गायिका गीता माळी मुंबईहून नाशिककडे परतत असताना झालेल्या भीषण अपघातात त्यांचे नुकतेच निधन झाले. अपघातात त्यांचे पती विजय माळी जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. माळी यांच्या निधनाने नाशिकमधील कलाक्षेत्रावर शोककळा पसरली आहे. गीता माळी या गेल्या तीन महिन्यांपासून अमेरिकेत गायनाच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. मुंबई विमानतळावर आल्यानंतर त्यांचे पती विजय माळी यांच्यासोबत त्या नाशिकला कारने येत होत्या. दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यांची कार ठाणे जिल्ह्यातील शहापूर परिसरात असलेल्या लाहे फाटानजीक आली असताना श्वानाला वाचविण्याच्या नादात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर धडकली. या घटनेत माळी यांना गंभीर दुखापत झाल्याने तात्काळ त्यांना शहापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र या घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. तर पती विजय हे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियातील सिडनी या शहरात वीर सावरकर विश्व साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी गायिका गीता माळी यांना गायनासाठी निमंत्रित करण्यात आले होते. दैनिक देशदूत आयोजित कर्मयोगिनी पुरस्कारांत गीता माळी यांना नामांकन मिळाले होते. गीता माळी यांनी संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत नावलौकिक मिळवला होता. त्यांच्या निधनाने नाशिकमधील कलाक्षेत्रावर शोककळा पसरली आहे.