शासनाकडून कोरडवाहू पिकांसाठी प्रती हेक्टर ८ हजार रुपये तर फळ बागायती / बारमाही पिकांसाठी प्रती हेक्टरी १८ हजार रुपयांची तातडीची मदत जाहीर.

मुंबई : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची टीका सर्वच पक्षांकडून होत असतांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गंभीर दखल घेत आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. यामुळे राज्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नुकसान झालेल्या कोरडवाहू पिकांसाठी प्रती हेक्टर ८ हजार रुपये तर फळ बागायती पिकांसाठी प्रती हेक्टरी १८ हजार रुपयांची तातडीची मदत शासनाकडून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. दोन हेक्टरपर्यंतच्या नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी ही मदत दिली जाईल. याशिवाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शाळा, महाविद्यालयातील परिक्षा शुल्क माफ करण्याचा तसेच आपद्ग्रस्त क्षेत्रात शेतसारा माफ करण्याचा निर्णयही राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी आज जाहीर केला. या मदतीचे वितरण तातडीने करण्यात यावे अशा सूचनाही राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी राज्य प्रशासनाला दिल्या आहेत.