
जळगाव : अतिवृष्टीमुळे राज्यात सर्वत्र शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी गावोगावी भेटी देऊन प्रशासनाला नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने जिल्हा कृषी अधिक्षक एस.के.ठाकूर यांच्या दालनात नुकताच नुकसानीचा आढावा घेतला असून केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती निकषानुसार नुकसानीच्या तिप्पट भरपाई मिळावी अशी मागणी खासदार उन्मेश पाटील यांनी केली आहे. यावेळी जिल्हा कृषी उपायुक्त अनिल भोकरे, संजय पवार, कावेरी पाटील, रमेश बागुल व कर्मचारी उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळे कोरडवाहू व बागायती दोन्ही शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरसकट प्रती हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत मिळावी, फळ बागायतदार शेतकऱ्यांना १ लाख रुपयांची मदत मिळावी यासह रब्बी हंगामात शेतकरी बांधवांना बियाणे व खत खरेदीसाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. राज्याच्या कृषी सचिवांची भेटही घेतली असून शेतकऱ्यांच्या पीक विमा प्रक्रिया पूर्ण करण्यासबंधीचे पत्रही दिले.
शेतकऱ्यांच्या पाठीशी राहून अन्नदाता शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळावी म्हणून माझे प्रयत्न राहतील. कमी अधिक नुकसान असा भेदभाव न करता सरसकट तिप्पट नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्नशिल असल्याचे खासदार उन्मेश पाटील यांनी कळविले आहे. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर यांनी राज्यपाल महोदयांकडे बैठक असून त्यावेळी यावर निर्णय होईल अशी माहिती दिली.