देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन

राष्ट्रीय विधी सेवा दिनाचे निमित्ताने हक्क, अधिकार आणि कायद्यांबाबत दिली सविस्तर माहिती

अमळनेर : राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्ताने आधार संस्था जिल्हा विधीसेवा प्राधिकरण, तालुका विधी सेवा समिती वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील गांधलीपुरा भागांतील देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी कायदेविषयक चर्चासत्र घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. यात त्यांचे हक्क, अधिकार आणि कायद्यांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.आर.जोशी, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आर. एम.कुऱ्हाडे, वकील संघाचे अध्यक्ष ॲड.किशोर बागूल, सहाय्यक सरकारी वकील ॲड. शशिकांत आर. पाटील , आधार संस्थाचे कार्यकारी संचालक रेणू प्रसाद यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आधार संस्थेच्या अध्यक्षा भारती पाटील यांनी केले. यामध्ये देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी संस्थेमार्फत राबवित असलेल्या विविध कार्यक्रमाची माहिती दिली.

कार्यक्रमास प्रमुख वक्ता म्हणून ॲड.भारती अग्रवाल यांनी विधीसेवेच्या अंतर्गत मिळणाऱ्या मोफत सेवा व योजनांबाबत तर ॲड. रियाज काझी यांनी अवैध मानवी वाहतूक कायद्याविषयी माहिती दिली. देहविक्री करणाऱ्या महिलांकडून अय्यास बी. शेख यांनी त्यांना जीवन जगत असतांना येणाऱ्या अडचणी आपल्या मनोगतातून मांडल्या. अध्यक्षीय भाषणात न्यायाधीश जोशी यांनी महिलांना मोफत विधीसेवा घेण्याबाबत आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हा कोर्ट वरिष्ठ लिपिक आर.पी.दुसाने यांच्यासह आधार संस्थेचे संजय कापडे, सईदा शेख, रंजु जैन, रीना चौधरी, वर्षा बडगुजर, आराज सैय्यद, अनिता बडगुजर, नंदिनी चौधरी यांचे अनमोल सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आश्विनी भदाणे यांनी तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन आधार संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक अल्केश वाघरे यांनी केले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!