पाच वर्ष व्यवसायासाठी बचत गटांना दिले होते गाळे. स्वतः व्यवसाय न करता त्यात होते पोट भाडेकरू.
अमळनेर : येथील पंचायत समितीच्या मालकीचे बसस्थानक जवळील गाळे (दुकाने) पोलीस बंदोबस्तात सभापती वजाबाई भिल, पं.स. सदस्य व गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांच्या आदेशाने खाली करण्यात आले. पंचायत समिती, अमळनेर मासिक सभा ता.१७/११/२००७ ठराव क्र.१४० व मासिक सभा ता.८/९/२००८ ठराव क्र.३०४ अन्वये बचत गटांना ग्रामीण विकास योजना अंतर्गत पाच वर्षांसाठी व्यवसाय करण्यासाठी हे गाळे दिले होते. यात, १) पेडकाई माता स्वयंसहायता बचत गट, धार २) कालभैरव बचत गट, बोदर्डे ३) जयलक्ष्मी स्वयंसहायता बचत गट, लोंढवे ४) संत तुकडोजी महाराज स्वयंसहायता बचत गट, जानवे ५) उत्तर महाराष्ट्र महिला विकास स्वयंसहायता बचत गट, टाकरखेडा या गटांचा समावेश होता. त्याठिकाणी बचत गटांनी स्वतः व्यवसाय न करता ते गाळे इतर पोट भाडेकरू ठेवून त्यांना व्यवसाय करण्यासाठी दिले होते. सदर प्रकार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या लक्षात येताच त्यांनी सदर गाळे रिकामे करण्यासाठी शासन नियमानुसार कामकाज करत गाळे खाली करण्यासाठी मा.जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात पिटीशन दाखल केली होती. त्याकामी पंचायत समिती, अमळनेर तर्फे वकील किरण पाटील यांनी कामकाज पाहिले होते. पिटीशन दाखल करण्यापूर्वीच उत्तर महाराष्ट्र महिला विकास स्वयंसहायता बचत गट, टाकरखेडा यांनी गाळ्याचा ताबा सोडला होता. जिल्हाधिकारी यांनी गाळे खाली करण्याचे आदेश देवून देखील इतर चार बचत गट गाळे खाली करत नसल्याने गटविकास अधिकारी व सभापती यांनी कर्मचारी व पोलीस प्रशासनाच्या मदतीने गाळे खाली केले. यानिमित्ताने तत्कालीन पंचायत समिती अमळनेर येथील लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांनी केलेल्या कार्यवाहीचे सर्वत्र कौतुक होत आहे. या निमित्ताने या बचत गटांची मुदत संपून देखील बचतगट कुणाच्या वरदहस्ताने दुकाने (गाळे) पोट भाडेकरू ठेवून बेकायदेशीर रित्या ताबा घेवून भाडे पट्टे चालू ठेवले होते ? हा प्रश्न अनुत्तरीत राहिला आहे. संबधित बचत गटांनी केलेल्या या बेकायदेशीर कामकाजावर शासन काय कार्यवाही करते ? याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.

