
अमळनेर : पारोळा येथील सुदर्शन नगर भागातील गोपाल गोविंद मरसाळे (वय १२) याचा मंगळवार, ता.१९ रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास भुईकोट किल्ल्यात तुटलेली पतंग पकडताना पाय घसरून मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, गोपाल मरसाळे हा पारोळा येथील शिवाजी हायस्कूल मध्ये आठवीत शिक्षण घेत होता. गुजरात प्रमाणे महाराष्ट्रात एक ते दीड महिना अगोदर मकरसंक्रांती निमित्त पतंग उडविण्यात येते. घटनेच्या दिवशी पारोळा येथील भुईकोट किल्ल्यात मोठे पटांगण असल्याने गोपाल व त्याचा भाऊ राकेश मरसाळे हे दोघे पतंग उडविण्यास गेले होते. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास तुटलेली पतंग पकडण्याच्या प्रयत्नात पळत असताना किल्ल्याच्या आत असलेल्या जमीनदोस्त विहिरीजवळ पतंग वर बघत पळत होते. अशातच अरुंद अशा विहिरीत तो पाय घसरून पडला. त्या विहिरीच्या आजूबाजूला पावसामुळे गवत उगवले होते. पळतांना विहीर लक्षात न आल्याने पाय घसरून विहिरीत पडला असावा असे कळते.
त्याचा भाऊ राकेशच्या लक्षात येताच, त्याने आरडाओरड करुन किल्ल्याच्या प्रवेशद्वारा बाहेरील लोकांकडे विनवणी केली व घडलेल्या घटनेची माहिती सांगितली. त्यानुसार उपस्थितांनी घटनास्थळी धाव घेतली. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अंधार होत असल्याने नगराध्यक्ष करण पवार यांनी तातडीने विद्युत दिव्याची सोय करुन पट्टीच्या पोहोणाऱ्यांना पाचारण केले. विहीरीची लांबी, रुंदी कमी आहे. वर्षानुवर्षे साचलेल्या पावसामुळे त्यात घाण साचलेली असून डासांचा मोठा उपद्रव आहे. यामुळे मृतदेह लोखंडी बिलाईचे सहाय्याने बाहेर काढण्यात आला. त्यानंतर कुटीर रुग्णालय पारोळा येथे दाखल करण्यात आले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनास्थळी गोपालची आई नकुबाई मरसाळे यांचा आक्रोश मन हेलावणारा होता. भुईकोट किल्ल्यात अश्याप्रकारच्या २० ते २५ विहिरी आहेत. या घटनेमुळे पुरातत्व विभाग भुईकोट किल्ल्याकडे लक्ष देईल काय ? अशी चर्चा होत आहे. पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल बापू पाटील करीत आहेत.