अमळनेर : “भाषा शुद्ध, अशुध्दतेच्या वादाने शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये दरी निर्माण केली. भाषा ही, भाषा असते. भाषा शुद्ध किंवा अशुद्ध नसते. जे अहिराणी भाषेला कमी लेखतात अशांना चौकात घेतले पाहिजे” असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ.राजन गवस यांनी व्यक्त केले. ते येथील छत्रपती शिवाजी नाट्यगृहात विभागीय खान्देशी बोली भाषा मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटनावेळी उद्घाटक म्हणून बोलत होते.
संमेलनाचे उद्घाटन डॉ. राजन गवस यांनी दिप प्रज्वलन करून केले. यावेळी संमेलनाध्यक्ष अशोक कौतीक कोळी, अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबई सदस्य व कवी रमेश पवार, कवी अशोक सोनवणे, तहसीलदार आबा महाजन, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, सानेगुरुजी वाचनालयाचे चिटणीस प्रकाश वाघ, सौ. माधुरी भांडारकर आदी उपस्थित होते. यावेळी पुज्य सानेगुरुजी यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. संमेलनाचे प्रास्ताविकात स्वागताध्यक्ष दिलीप सोनवणे यांनी साहित्य चळवळीत स्थानिक साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करण्याच्या उद्देशाने संमेलनाचे आयोजन केले असल्याचे सांगितले
श्री गवस पुढे म्हणाले की, जी सगळया भाषांना जवळची असते ती प्रमाण भाषा असते, कोणत्याही शिक्षित माणसाला प्रमाण भाषेचे नियम माहिती असावे, भाषा शुद्ध अशुध्दतेच्या वादाने शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये दरी निर्माण केली. बोलीची खोली व समृद्धपण तिच्या प्रमाणावर अवलंबून आहे. त्यामुळेच संस्कृत भाषा एक तळे झाले आहे, याकडे येणारा ओढा कमी आहे. मराठीची अवस्था अशा बोली भाषेसारखी करायची आहे का ? बोली भाषेतील शब्द प्रमाण भाषेत यायला लागले. जगण्यातून तयार झालेल्या म्हणी, गाणे निरक्षर लोकांनी जगतांना जे ज्ञान मिळविले तो केवळ अक्षर येत नाही म्हणून अनाडी कसा ? अक्षरात ज्ञान असते का ? बोली भाषेकडे आपण हेतुपुरस्कर दुर्लक्ष केल्याचे मत ही त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.
संमेलनाध्यक्ष अशोक कोळी म्हणाले की, मनोरंजनासाठी लेखन नको, साहित्यिक चळवळीसाठी लेखन हवे. लेखकाने आपल्या मताशी ठाम असावे, लेखणी शोषित समाजासाठी चालवली गेली पाहिजे असे आवाहन केले. खान्देशातील तावडी भाषेला एक वेगळे महत्त्व आहे. अश्या सर्व बोलीभाषा आता समुद्ध होतांना दिसत आहेत. तावडीभाषा ही माझी आई असेल तर इतर बोली माझ्या मायमावशी आहेत असेही तेे म्हणाले.
रमेश पवार म्हणाले की, अमळनेर नगरीत विभागीय साहित्य संमेलनाचे आयोजनामुळे अनेक खान्देशी साहित्यिक, लेखक व कवींना संधी प्राप्त करून दिली. याबद्दल आयोजकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्यात. विभागीय खान्देश बोली साहित्यामुळे बोली भाषेचे महत्त्व वाढेल असे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य अशोक सोनवणे म्हणाले कि सानेगुरुजी यांच्या कर्मभूमीत साहित्य संमेलन होण्याचा आनंद व्यक्त केला तर साहित्य संमेलनाचा श्रोते आनंद घेण्यापासून वंचित राहतात अशी खंतही व्यक्त केली. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन प्रा. प्रकाश धर्माधिकारी यांनी केले तर आभार दिलीप सोनवणे यांनी मानले.

