विविध शाळांचे विद्यार्थ्यांचा ग्रंथदिंडीत मोठा सहभाग
अमळनेर : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुरस्कृत, पू. साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय आयोजित विभागीय खान्देशी बोली मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटनापुर्वी सानेगुरुजी ग्रंथालय व वाचनालय येथून साहित्य चळवळीतील मान्यवरांनी ग्रंथ ठेवलेल्या पालखीला उचलून ग्रंथदिंडी चा शुभारंभ केला. संस्कृती व संस्कारांचा जागर करणारी ग्रंथदिंडी तुतारी-ढोल ताश्यांच्या गजरात वाजत गाजत पाचपाऊली देवी मंदिर, बसस्थानक, धुळे रोड, विश्राम गृह, स्टेशन रोड मार्गे छत्रपती शिवाजी नाट्यगृह येथे आणण्यात आली. ग्रंथदिंडी सोहळ्यास संमेलनाध्यक्ष अशोक कोळी, स्वागताध्यक्ष दिलीप सोनवणे, सौ.ज्योतिर्मयी सोनवणे, अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील, राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य रमेश पवार, सदस्य अशोक सोनवणे, तहसीलदार आबा महाजन, ग्रंथालय सचिव प्रकाश वाघ आदी मान्यवर होते.
ग्रंथदिंडीत पारंपारिक वेशभूषेत चालणारा पोतराज, तुतारी वाजवणारे मावळे, फेटा बांधून अश्वारूढ सुकन्या, डोक्यावर कळस घेऊन चालणाऱ्या मुली, टाळ वाजवणारे बाल वारकरी, भजनी मंडळ, सजवलेल्या वाहनावर जात्या वर ओवी गाणाऱ्या कवियत्री बहिणाबाई यांचा देखावा तसेच विविध पुस्तकांची, साहित्यिकांची नावे, प्रतिमा असलेले फलक हाती घेतलेली मुले, ढोल ताशे वाजवणारे वादक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. ग्रंथ दिंडीच्या केंद्रस्थानी असलेल्या पालखीत ठेवलेले भारताचे संविधान, तुकाराम गाथा, शेतकऱ्यांचा आसूड, दासबोध, लिलाचरित्र आदी ग्रंथ ठेवण्यात आले होते. विविध बोलीभाषांतील ठाकरी, लेवा पाटीदार, पावरी, वारली, तिरोली, मालवणी, भिल्ली, बागलाणी, डांगी, वंजारी बोलीभाषांचे नामफलक हातात घेत विद्यार्थी जागर करीत होते. ग्रंथदिंडीत शारदा माध्यमिक विद्यालय, कळमसरे,भगिनी मंडळ विद्यालय, पू.सानेगुरुजी कन्या स्कुल, सानेगुरुजी माध्यमिक विद्यालय, जी एस हायस्कूल, द्रो. रा. कन्या हायस्कुल, लोकमान्य विद्यालय, विजय नाना आर्मी स्कुल, ज्ञानेश्वर पाठशाळा, सरस्वती विद्यामंदीर आदी शाळांचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या दिंडीत सहभागी झालेले होते.
याप्रसंगी सानेगुरुजी ग्रंथालयाच्या उपाध्यक्षा सौ.माधुरी भांडारकर, प्रा.डॉ. प्र.ज.जोशी, नगिन लोढा, सुमित धाडकर, ईश्वर महाजन, रणजित शिंदे, दिपक वाल्हे, निलेश पाटील, चंद्रकांत नगावकर, दिनेश नाईक, विजया गायकवाड, सौ.वसुंधरा लांडगे, भीमराव जाधव, अनिल घासकडवी, पी.एन.भादलीकर, ॲड. रामकृष्ण उपासनी, प्रसाद जोशी, डॉ.राजेंद्र पिंगळे, हेमंत भांडारकर, उमेश काटे, ॲड. तिलोत्तमा पाटील, रुपाली पाटील, शैलजा माहेश्वरी आदी साहित्यप्रेमी उपस्थित होते.
, .

