अमळनेर : येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात सुरु असलेल्या पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय आयोजित महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई पुरस्कृत विभागीय खान्देशी बोली मराठी साहित्य संमेलनात कथाकथन व ‘मन्हीं अहिराणी ना गोडवा’ कार्यक्रम रंगला. सोलापूर येथील ज्येष्ठ कथाकार डॉ.अर्जुन व्हटकर यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ९.३० ते ११ या वेळात कथाकथनाचा कार्यक्रम पार पडला. यात सुभाष अहिरे- धुळे, वाल्मिक अहिरे- पाचोरा, डॉ.एस.के.पाटील- दाभाडी यांचा सहभाग होता.
दुपारी ११.३० ते २ वेळात शिरपूर येथील कलावंत नारायण महाजन यांचा “मन्ही अहिराणी ना गोडवा” कार्यक्रम पार पडला. यात संवादक म्हणून शिंदखेड्याचे तहसीलदार सुदाम महाजन यांचा सहभाग होता. अहिराणी भाषेतील गोडवा मांडणाऱ्या ‘मन्हीं अहिराणी ना गोडवा’ या कार्यक्रमाने विभागीय खान्देशी बोली साहित्य संमेलनात अहिराणी संस्कृती ची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली. तहसीलदार सुदाम महाजन यांनी सुंदर संवाद साधला. प्रास्ताविकात अहिराणी बोलीभाषेची महती पटवून दिली. आईची महिमा सांगणारी अहिराणी गाणी प्रभावी ठरली. गाववाड्याचे वर्णन करतांना ‘सातपुडा ने पायथा ले शे मन्ह गांव’ असे सांगत आजच्या ग्रामीण जीवनात निर्माण झालेला आपापसातील दुरावा शब्दांतून मांडला. ‘आधी पाच पंचसवर धकी जाय आम्हन..आते सुप्रिम कोर्ट मा चालना गया गावगाडा’ या अहिराणी ओवीतून मांडला. सामाजिक प्रश्नांवर भाष्य करतांना स्त्री भृणहत्येवर आधारित “बेटी धन नी पेटी, गर्भ मा मारी टाकी” तसेच “लेक मारी मारी, व्हई गयात कमी पोरी, पोऱ्या कसं लगीन करी” या रचना सादर केल्या. सद्यस्थितीत ग्रामीण भागात निर्माण झालेल्या लग्नाच्या समस्येवर मार्मिक भाष्य करतांना “माय मनं जल्दी लगीन कर, लोक माले म्हंनतस निब्बर” अशा ओव्या सांगितल्या. यावर हास्याचे फवारे उडाले. महाजन यांनी ओघवत्या शैलीत सादर केलेल्या अहिराणी भाषेतील रचनांना प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून भरभरुन दाद दिली.
कार्यक्रमात सुरुवातीला मान्यवरांचे आयोजकांतर्फे स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी प्रताप महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.ज्योती राणे, अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील, कवी रमेश पवार , डॉ.एस.के. पाटील, चेतन सोनार, संजय चौधरी, रणजित शिंदे, प्रा लिलाधर पाटील, सौ.वसुंधरा लांडगे, भारती गाला, अपेक्षा पवार, ॲड. तिलोत्तमा पाटील, नगरसेवक साखरलाल महाजन, शैलेश काळकर, नगीनचंद लोढा, भीमराव जाधव, हेमंत भांडारकर, पी. एन. भादलीकर, चंद्रकांत नगावकर, प्रा.शैलजा माहेश्वरी, ईश्वर महाजन, दिपक वाल्हे आदींसह पत्रकार उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रकाश धर्माधिकारी यांनी तर आभार प्रदर्शन सौ माधुरी भांडारकर यांनी केले.

