महात्मा फुले हायस्कूल मध्ये संविधान दिन साजरा

वक्तृत्व स्पर्धेचे केले आयोजन, विजेत्यांना बक्षीसे

अमळनेर : भारतीय संविधानामुळे जगातील सर्वात मजबूत लोकशाही आपल्या देशात आहे भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि समान संधी मिळवून दिली असे प्रतिपादन देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले संस्थेचे अध्यक्ष विलासराव पाटील यांनी केले. संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. व्यासपीठावर त्यांंचेसोबत मुख्याध्यापक अनिल महाजन होते. यावेळी प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
ते पुढे म्हणाले की, सामाजिक समतेचा पाया अधिक मजबूत केला तरच राजकीय लोकशाही राजकीय समता टिकेल . स्वातंत्र्य, समता ,बंधुता यातील तत्व जरी लक्षात आले तरी खूप काही झाल्यासारखे होईल. सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर केली नाही तर सामाजिक आणि विषमतेची दाहकता भोगणारा वर्ग लोकशाहीचा डोलारा उद्ध्वस्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता. याचा आपण विचार करून संविधानिक मार्गाने देशातील सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत त्यातूनच संविधानातील खरा भारत साकारू शकू असेही सांगितले.
शाळेत संविधान दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. त्यात प्रथम – खुशी डांगे इ.१० वी, द्वितीय – अश्विनी महाजन इ.९ वी, तृतीय – यशस्वी पाटील इ.८ वी, उत्तेजनार्थ – नेहा पाटील इ.९ वी, रजनी माळी इ.८ वी यशाचे मानकरी ठरले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विलासराव पाटील यांच्या हस्ते त्यांना बक्षिसे देण्यात आली. शिक्षक आय.आर. महाजन यांच्याकडून बक्षीस प्राप्त विद्यार्थ्यांना पाच पुस्तके देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वर महाजन यांनी तर आभार प्रदर्शन एस. के. महाजन यांनी केलेे. परीक्षक म्हणून अरविंद सोनटक्के यांनी काम पाहिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एच.ओ. माळी, शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!