महात्मा फुले यांचा त्याग आणि बहुजनांच्या कल्याणासाठी केलेले कार्य सर्वश्रुत. त्यांचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिवस व्हावा

अमळनेर : महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृतिदिन २८ नोव्हेंबरला असतो. हा दिवस शिक्षक दिवस म्हणून साजरा व्हावा यासाठी ओबीसी शिक्षक पालक विकास असोसिएशन शाखा जळगाव यांच्यावतीने नुकतेच गटशिक्षणाधिकारी आर. डी. महाजन यांना निवेदन देण्यात आले. शासन स्तरावर २८ नोव्हेंबर हा दिवस शिक्षक दिवस म्हणून साजरा करण्यात यावा यासंदर्भात असोसिएशनचे राज्याध्यक्ष विलासराव पाटील यांंचा पत्रव्यवहार सुरुच आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की, शिक्षक दिवस हा चारित्र्यसंपन्न व आदर्श शिक्षकांचे गुण असणाऱ्या व्यक्तीच्या नावाने साजरा केला पाहिजे. महात्मा फुले यांचा त्याग आणि बहुजनांच्या कल्याणासाठी केलेले कार्य सर्वश्रुत आहे. डॉक्टर राधाकृष्णन यांच्या जन्माच्या चाळीस वर्ष अगोदर महात्मा फुले यांनी पुण्यात मुलींची शाळा सुरू केली. हंटर कमिशन समोर १९ ऑक्टोबर १८८२ रोजी बहुजनांच्या मुलांना बारा वर्षापर्यंत प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत देण्याची मागणी करणारे महात्मा फुले होते. म्हणून महात्मा फुले यांचा स्मृतिदिन खरा शिक्षक दिवस आहे. हा दिवस शिक्षक दिवस म्हणून साजरा व्हावा यासाठी ओबीसी शिक्षक पालक विकास असोसिएशन शाखा जळगाव यांच्यावतीने तालुक्यातील सर्व शाळांना पत्र काढून तसे आदेश द्यावेत अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहेेेे. निवेदनावर ओबीसी शिक्षक असोसिएशन चे राज्याध्यक्ष विलासराव पाटील, जळगाव जिल्हा अध्यक्ष ईश्वर महाजन, तालुकाध्यक्ष डी.ए. सोनवणे, मुख्याध्यापक संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एम.ए.पाटील, पक्षीमित्र अश्विन पाटील, जिल्हा कार्यकारणी सदस्य पी.एस विंचुरकर ज्येष्ठ सल्लागार दशरथ लांडगे, शिक्षक सेनेचे तालुकाध्यक्ष संदीप बोरसे व पदाधिकारी यांच्या पत्रकावर सह्या आहेत.