“चांगल्या बाजूने उभे राहणे हे विचारी माणसाचे काम” : डॉ. एल.ए.पाटील

शिवशाही फाऊंडेशनच्या सामाजिक उपक्रमाचे मान्यवरांकडून कौतुक

अमळनेर : ” चांगल्या बाजूने उभे राहणे विचारी माणसाचे काम आहे ” असे मत प्रताप महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ.एल.ए.पाटील यांनी केले. संविधान दिन व शहीद दिनानिमित्त येथील शिवशाही फाउंडेशन तर्फे नुकताच ढेकु रोडवरील काटे पॅलेस येथे कार्यक्रम झाला. यात “भारतीय संविधानाचे योगदान” या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ होते. विचार मंचावर प्रमुख पाहुणे शिक्षण विस्तार अधिकारी अशोक बिऱ्हाडे (धरणगाव), प्रताप महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस.ओ. माळी, सानेगुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.डी.देशमुख तसेच विजयनाना पाटील आर्मी स्कूलचे प्राचार्य एस.यु.पाटील यांचेसह शिवशाही फाऊंडेशनचे अध्यक्ष जयेशकुमार काटे होते.

सुरुवातीस मान्यवरांचे हस्ते शहीदांना श्रध्दांजली अर्पण करुन भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमात मान्यवरांसह उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय सोनवणे (पिंगळवाडे), दर्शना चौधरी (शिरूड) तसेच साने गुरुजी शिक्षक पतसंस्थेच्या नूतन अध्यक्ष सुलोचना पाटील यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. पत्रकार संजय सूर्यवंशी, विजय गाढे, सुनिल करंदीकर, समाधान मैराळे, जयंत वानखेडे यांचेही स्वागत करण्यात आले.

डॉ. एल. ए. पाटील म्हणाले की, हा कार्यक्रम मनोरंजनाचा नव्हे तर देशहिताचा आहे. संविधानामुळे देशाची धुरा राखली गेली. न्याय, समता, बंधुता हे संविधानाचे उद्दीष्ट आहे. सार्वभौम म्हणजे या घटनेने दिलेले सर्व अधिकार. परंपरेने कोणी राजा नसून घटनेने तो अधिकार त्यांना दिलेला आहे. संसद हे कायदेमंडळ असून लोकांना न्याय देणे ही समाजवादी व्यवस्था आहे. धर्मनिरपेक्ष म्हणजे दुसऱ्या धर्माबद्दल न बोलणे. जात, पात, धर्म, वंश आहेत.. जात हा महत्वाचा विषय असून जातच निघाली की, सर्व काही निघून जाईल. १९०९ भारत प्रशासन कायदा, १९३५ चा कायदा, १९४२ चले जाव चळवळीचा संदर्भ दिला. त्या परिस्थितीत डॉ. बाबासाहेब यांनी आपल्या विचारांशी ठाम राहून लढा दिला व संविधान लिहिले. अखेर ऑगष्ट १९४७ ला घटनेचा मसुदा तयार करुन डॉ.राजेंद्र प्रसाद यांचेकडे दिला त्यांनी तो जनतेसमोर ठेवला. त्यातून आलेल्या सूचनांचा विचार करुन घटना तयार केली. २६ नोव्हेंबर १९४९ ला घटना स्विकारुन २६ जानेवारी १९५० ला लागू झाली. गेली ७० वर्षे ही घटना न्याय देते हे विशेष. मँनेज केलेली कोणतीही गोष्ट टिकाऊ नसते. सत्य हे सत्य असते. हक्कांचा जन्म कर्तव्यातून होतो. विचारांचं गाठोडं म्हणजे मन… चांगल्या बाजूने उभे राहणे विचारी माणसाचे काम आहे असेही ते म्हणाले. राजकीय काही लोक स्वातंत्र्य, समता याचा विचार करत नाहीत. शिक्षणाने आम्हाला खोटे बोलायला शिकवलं अशी खंत त्यांनी व्यक्त केली. संविधान हाच आपला धर्म असून त्याचे पालन करा, आदर करा. नागरिकांची कर्तव्ये पटवून देत न्याय, समता, बंधुता, स्वतंत्रता यासाठी विचार आवश्यक असल्याचे सांगितले.

तहसीलदार मिलींद वाघ व शिक्षण विस्तार अधिकारी अशोक बिऱ्हाडे यांनीही संविधानाचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरंजन पेंढारे यांनी केले. तर उमेश काटे यांनी आभार मानले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!