
राजकारणात सर्व काही चालते असे म्हटले जाते. साम, दाम, दंड, भेद वापरुन राजकारण करावे लागते. वेळप्रसंगी थोडे फटकून वागणारे अशीच काहीशी उद्धव ठाकरे यांची ओळख. शिवसेना पक्षाची जबाबदारी घेतल्यानंतर त्यांच्या कुवतीबद्दल अनेकांनी शंका घेतली. जेव्हा जेव्हा काही करण्याची वेळ आली, त्या-त्या वेळी आपली क्षमता सिद्ध करणारा नेता अशी त्यांची ओळख संपूर्ण देशाला झाली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊन त्यांनी ते सिध्द करून दाखवले आहे. शपथ घेतेवेळी त्यांचं नतमस्तक होणं खूप काही सांगून जातं. नम्रपणे तमाम जनता व मायभूमीचे आभार व्यक्त केले. उत्तम फोटोग्राफर असणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या गडकिल्ल्यांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे संपूर्ण देशात कौतुक झाले. महाराष्ट्राचा ऐतिहासिक, पुरातत्त्व ठेवा कॅमेऱ्यात बंदिस्त करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या रूपाने महाराष्ट्राला कलावंत मुख्यमंत्री लाभला आहे.
शिवसेना हा प्रचंड लोकसंग्रह व जनाधार असलेला पक्ष आहे. बाळासाहेबांचे वारसदार म्हणून उद्धव यांचे नाव पुढे येईल, हे कुणाच्याही ध्यानीमनी नव्हते. शांत स्वभाव व मवाळ वागणूक असल्याने त्यांना शिवसेनेसारख्या आक्रमक पक्षाच्या राजकारणात रस नव्हता. बाळासाहेबांचे वादळ जेव्हा महाराष्ट्रात घोंघावत होते, तेव्हा ते जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये फोटोग्राफीचे शिक्षण घेत होते. ‘मला राजकारणात कधीच यायचं नव्हतं. मी इथे मनापासून आलो नाही. ही जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आलीय’, हे त्यांनी अनेकदा सांगितले आहे. पण ‘एकदा कां जबाबदारी स्वीकारली की ते मागे फिरत नाही. हे त्यांनी सिध्द करून दाखवले आहे.
शिवसेनेत त्यांचा राजकारणातील प्रारंभ सन २००२ च्या मुंबई महापालिका निवडणुकीपासून झाला. या निवडणुकीत शिवसेनेची धुरा जरी बाळासाहेबांकडे असली तरी, त्याचे नियोजन व रणनीती त्यांनीच ठरवली होती. या निवडणुकीत शिवसेनेने ९८ जागा जिंकल्या आणि उद्धव यांचे नेतृत्व प्रस्थापित झाले. त्यानंतरच शिवसेनेत स्थित्यंतर घडू लागले. जानेवारी २००३ मध्ये लोणावळ्यातील पक्ष बैठकीत शिवसेनेचे कार्याध्यक्ष म्हणून उद्धव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आणि लागलीच उद्धव यांचा राजकीय संघर्ष सुरू झाला. नारायण राणे, पाठोपाठ राज ठाकरे यांच्या बंडामुळे आता शिवसेना संपणार असेच चित्र निर्माण झाले होते. यामुळे सन २००७ ची मुंबई महापालिका निवडणूक ही त्यांच्यासाठी कसोटीची होती. असे असतांना शिवसेनेने ८४ जागा जिंकल्या व उद्धव यांचे नेतृत्व अधिक बळकट झाले. २०१२ मध्ये ७५ व २०१७ मध्ये पुन्हा ८४ जागा जिंकून एकहाती सत्ता घेत शिवसेना यशाकडे नेली. उद्धव ठाकरे यांनी नेहमीच आमदार, खासदारांपेक्षा पक्षीय काम करणाऱ्यांना महत्त्व दिले. मुंबईतील राजकारणात विभागप्रमुख आणि राज्यातील राजकारणात जिल्हाप्रमुखांच्या शब्दाला मान दिला. याशिवाय नेत्यांची नवी पिढी तयार करतानाही त्यांनी बाळासाहेबांच्या काळातील नेत्यांना पहिल्या रांगेत स्थान दिले. जुने जाणते नेते कार्यरत असल्यामुळेच पक्षावरील पकड कायम राहून शिवसेना मोठ्या आव्हानांना सामोरी गेली. विधानसभा, लोकसभा निवडणुकांतही उद्धव यांनी कधी भाजपशी खांद्याला खांदा लावून तर कधी संघर्ष करून शिवसेनेला तारले आणि वाढवले. संघर्षाची वेळ येता, उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे एकहाती नेतृत्व केले व कार्यकर्त्यांत जोश भरला. प्रतिकूलता परिस्थितीत शांतपणे संधीची प्रतीक्षा करायची आणि ती दृष्टिपथात येताच सर्वस्व पणाला लावून यश मिळवायचे, ही त्यांची विजयनीती आहे. शिवसेनेकडे आलेले मुख्यमंत्रीपद हा त्याचाच एक भाग.