
अमळनेर : उपविभागीय अधिकाऱ्यांनी आदेश देऊनही वृद्ध माता पित्यांना उपजिविकेला पैसे न देणार्या तालुक्यातील कळमसरे येथील मुलगा व सुनेविरुद्ध माता पिता व जेष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंंदर्भात तालुक्यातील कळमसरे येथील सुरेश बुधा बडगुजर यांनी मारवड पोलीसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा स्वतःचा मुलगा प्रताप व सून रोहिणी हे दोघे आपल्याला उपजीविकेसाठी पैसे देत नाही. पैसे मागितल्यास शिवीगाळ व मारहाण करतात. माझी पत्नी व मला सांभाळण्यास नकार देतात. त्यामुळे माझे जीवन कष्टमय झाले असल्याची तक्रार उपविभागीय अधिकारी यांचेकडे केली होती. त्यावर सुनावणी होऊन मुलाला आई वडिलांना वागवण्याचे आदेश दिले होते. मात्र, आदेशाचे पालन झाले नव्हते. यामुळे प्रांताधिकारी यांचे आदेशाने वृद्धांची फिर्याद घेऊन मुलगा व सुनेविरुद्ध माता पिता व जेष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २३, २४ भादंवि ३२३, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल बाळकृष्ण शिंदे करीत आहेत.