पर्यायी मार्गाने वाहतुक करण्याचे जिल्हा पोलीस अधिक्षकांचे नागरिकांना आवाहन
जळगाव : राज्य शासनामार्फत मेहेरगाव-धुळे-अमळनेर-चोपडा-खरगोन रस्ता राज्यमार्ग- १५ कि.मी ८६/५०० मधील निमगव्हाण – सावखेडा जवळील तापी नदीवरील पुल दुरूस्तीचे काम करण्यात येत आहे. या कामाचा ठेका मे.सॅनफिल्ड इंडिया लिमिटेड, भोपाळ या कंपनीला देण्यात आलेला आहे. पुलाच्या जुन्या बिअरींग बसविणे, नवीन एक्स्पान्शन जॉइंट बसविणे आदि बाबींचा कामात समावेश आहे. या कामाची व्याप्ती पाहता प्रत्यक्षात काम करताना पुलाचे गर्डर उचलून नवीन बिअरिंग बसविणे प्रस्तावित असल्याने पुलावरील वाहतुक कमीत कमी एक महिना बंद करणे आवश्यक आहे. तसेच पुलाच्या शेजारुन पर्यायी मार्ग बनविणे अशक्य आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुक पर्यायी मार्गावरून वळविणे आवश्यक आहे.
वाहनांच्या विनियमनासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोपडा ते जळगाव (धरणगाव मार्गे), चोपडा ते अमळनेर, चोपडा ते धरणगाव या तीन्ही मार्गावरून येणारी व जाणारी सर्व प्रकारच्या वाहतुकीस रविवार, १ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०१९ पावेतो सर्व प्रकारची वाहतुक बंद करून पर्यायी मार्गाने वाहतुक वळविण्यात येत आहे.
चोपडा ते जळगाव (धरणगाव मार्गे) होणाऱ्या वाहतुकीकरिता नागरिकांनी पर्यायी मार्ग चोपडा- अडावद- धानोरा मार्गे जळगाव या पर्यायी मार्गाचा, येण्यासाठी व जाण्यासाठी वापर करावा. चोपडा ते अमळनेर दरम्यान होणाऱ्या वाहतुकीकरिता नागरिकांनी चोपडा- हातेड बु. मार्गे किंवा अमळगाव- जळोद मार्गे या पर्यायी मार्गाचा, तसेेच चोपडा ते धरणगाव दरम्यान होणाऱ्या वाहतुकीसाठी नागरिकांनी चोपडा- हातेड- जळोद- अमळगाव- नांद्री- पातोंडा मार्गे या पर्यायी मार्गाचा येण्यासाठी व जाण्यासाठी वापर करावा. या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.