गौण खनिज चोरी रोखण्यासाठी रासप तर्फे प्रशासनाला निवेदन

अमळनेर : शहरात मोठ्या प्रमाणात गौण खनिज (वाळू, मुरूम) चोरी होत असल्याचे चित्र आहे. राष्ट्रीय गौण खनिज चोरी करणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करणे गरजेचे असून निद्रावस्थेत असलेल्या महसूल विभागाने ही चोरी थांबवावी यासाठी आज राष्ट्रीय समाज पक्षातर्फे युवती जिल्हाध्यक्ष ज्योती भोई यांनी उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे व तहसीलदार मिलींद वाघ यांना निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील तीन मुख्य नदीच्या प्रवाहाद्वारे शहरासह अमळनेर तालुक्याला पाण्याचा प्रवाह होत आहे. या नद्यांमध्ये नैसर्गिक रित्या आलेली राष्ट्रीय संपत्ती (वाळू) गौण खनिजांची लूट होत आहे. राष्ट्रीय गौण खनिजांची चोरी करणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करणे गरजेचे असतांना महसूल विभाग निद्रावस्थेत असल्याचे संपूर्ण तालुक्याला दिसून येत आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी अनेकदा लेखी, तोंडी, समक्ष भेटून व भ्रमणध्वनी द्वारे तक्रारी करूनही महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी दंडात्मक कार्यवाही करीत असल्याचे दिसून येत नाही. या भूमिकेबद्दल तालुक्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे. यामुळे दिलेल्या निवेदनावर ८ दिवसांचे आत कठोर व दंडात्मक कार्यवाही न झाल्यास राष्ट्रीय समाज पक्षातर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी सर्वस्वी जबाबदार असतील असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर योगेश पाटील, संतोष लोहार, जोत्स्ना लोहार, संगीता मैलागीर, भारती पाटील, कल्पना मिस्तरी, प्रिया वाघ, सुशीलाबाई भोई, आशा बाविस्कर, सुनंदा पाटील, महेश चौधरी, उमेश पाटील, पंकज लांडगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!