पोटनिवडणुकीत तासखेडा लोकनियुक्त सरपंचपदी सुनंदा भिल, सावखेडा सदस्यपदी कोकिळा आहिरे, जळोद सदस्यपदी अर्जुन कोळी बिनविरोध

अमळनेर : नुकतीच तालुक्यातील धार आणि तासखेडा ग्रामपंचायत निवडणूक झाली. धार येथील ग्रामपंचायत निवडणुकीत लोकमान्य पॅनलचे दगडू सैंदाणे लोकनियुक्त सरपंच झाले असले तरी बहुमत परिवर्तन पॅनलला मिळाले. तर तासखेडा येथील सरपंच पदाची पोटनिवडणुक होवून लोकनियुक्त सरपंच म्हणून सुनंदा मंगल भिल निवडून आल्या आहेत. धार ग्रामपंचायत निवडणुकीत दोन पॅनल मध्ये सरळ लढत होती. त्यात परिवर्तन पॅनलचे ९ पैकी उषाबाई भिल, मनोहर पाटील, प्रफुल्लता पाटील, शशिकांत बोरसे, दमोताबाई पाटील, सुफीयाबी मुजावर हे सहा सदस्य निवडून आलेत तर लोकमान्य पॅनलचे सरपंच पदासह प्रवीण कुमार सैंदाणे, मंगलाबाई पाटील, उषाबाई पाटील हे तीन सदस्य प्रभाग क्रमांक तीन मधून निवडून आले आहेत.
तासखेडा येथील सरपंच वेळेवर अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर करू न शकल्याने सरपंच पद अपात्र ठरले होते. यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत लोकनियुक्त सरपंचपदी सुनंदा मंगल भिल निवडून आल्या आहेत. तर सावखेडा येथील सरपंच कोकिळा आत्माराम आहिरे या देखील अनुसूचीत जमातीचा जात वैधता प्रमाणपत्र सादर करू न शकल्यामुळे अपात्र ठरवण्यात आल्या होत्या. पोटनिवडणुकीत त्या जागेवर पुन्हा कोकिळा आहिरे सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत. तसेच जळोद येथे अर्जुन कोळी हे बिनविरोध निवडून आले आहेत.
मतमोजणी अधिकारी म्हणून निवासी नायब तहसीलदार कमलाकर जोशी यांनी काम पाहिले. तलाठी स्वप्नील कुलकर्णी, धीरज देशमुख, विकास परदेशी, पराग पाटील, नितीन ढोकणे यांनी सहकार्य केले. निवडणूक अधिकारी म्हणून मनोज सोनार, अमोल भदाणे, राजेंद्र शिरसाठ यांनी काम पाहिले.