अमळनेर : येथील सामाजिक कार्यकर्त्या प्रा. जयश्री साळुंके यांची कन्या कु. तनया हिचा विवाह चोपडा येथील गुलाब चव्हाण यांचे सुपुत्र चि.मयूर यांचेशी नुकताच (ता.८) संपन्न झाला. विविध समाजाने आदर्श घ्यावा असा आगळा वेगळा विवाह सोहळा जीवनज्योती कॉलनी, अमळनेर येथे पार पडला. पारंपरिक पद्धतींना फाटा देत विविध उपक्रमांनी विवाह सोहळा संपन्न झाला.
अपंग बांधव आणि ममता विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थी लग्न सोहळ्याचे विशेष मानकरी आणि प्रमुख अतिथी होते. यावेळी अपंग व्यक्तींचा स्टीलचा टिफीन देऊन सत्कार तर ममता विद्यालयातील विद्यार्थ्यांना शाळेचे गणवेश वाटप करून सत्कार करण्यात आला. विवाह प्रसंगी अक्षदा म्हणून तांदळाचा उपयोग न करता फुलांचा वर्षाव करण्यात आला. पारंपरिक आदिवासी गाणी, वाद्य, नृत्याने लग्नाची वरात निघाल्याने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. प्रा. जयश्री साळुंके यांनी स्वतः लिहलेेली आदिवासी मंगलाष्टके सौ वसुंधरा लांडगे यांनी अत्यंत वैशिष्ट्य पूर्ण पध्दतीने म्हटली. मंडपाचे प्रवेशद्वारावर क्रांतीकारक महामानवांना मानवंदना देण्यात आली होती. प्रा. जयश्री साळुंके गेल्या २० वर्षांपासून समाज कार्य करीत असून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असतात. मुलीच्या विवाहाप्रसंगी त्यांनी सर्वच समाजाला नवा आदर्श घालून दिला आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांची विवाह सोहळ्यास उपस्थिती होती.

