अमळनेरचे ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील यांचाही समावेश

अमळनेर : महाराष्ट्र राज्य खान्देश साहित्य संघ, धुळे शाखा नाशिकच्या वतीने ता.१५ डिसेंबर रोजी नाशिक येथे अहिराणी कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात खान्देशातील साहित्यिकांना’ खान्देश भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यात ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील यांचाही ‘खान्देश भूषण’ पुरस्कारासाठी समावेश आहे. कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक किर्तनकार ह.भ.प. प्रा. चत्रभुज सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे.
संमेलनाचे उद्घाटन स्वीय सहाय्यक राजेंद्र गोसावी (मुंबई) यांच्या हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून शिंदखेड्याचे तहसीलदार सुदाम महाजन यांची निवड करण्यात आली आहे. खान्देशातील राजाभाऊ कुलकर्णी (धुळे), कृष्णा पाटील (अमळनेर ), सुनंदा वैद्य (धुळे), प्रभा बँकर (धुळे), प्रा. वा. ना. आंधळे (जळगाव), प्रा. तानसेन जगताप (चाळीसगाव), रामदास वाघ (धुळे), डॉ. रमेश सूर्यवंशी (औरंगाबाद), कमलाकर देसले (झोडगे) आदींचा खान्देश भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. संमेलनाचे आयोजन केंद्रीय अध्यक्ष प्रा. सदाशिव सूर्यवंशी व नाशिकच्या जिल्हाध्यक्षा सुनिता पाटील यांनी केले आहे.