
अमळनेर : ‘लेखन करणे त्यासाठी भाषा वापरणे ही एक बहुआयामी प्रक्रिया असून आपल्या सभोवतालचे अनुभव मांडताना लेखक भाषा देखील घडवत असतो. या आदान प्रदानातूनच वाचक समृद्ध होत जातो. यामुळे वाचकाने खुल्या मनाने वाचन करणे व लेखकाने मुक्त होऊन लिहीत जाणे आवश्यक असल्याचे मत लेखक डॉ. प्रशांत बागड यांनी व्यक्त केले. ते पूज्य साने गुरुजी ग्रंथालय, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा अमळनेर व शिव बहुद्देशीय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “साहित्यिक गप्पा “या कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पुज्य साने गुरुजी ग्रंथालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे होते. विचार मंचावर प्रा. प्रकाश धर्माधिकारी, शिव बहुद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष रणजित शिंदे उपस्थित होते.
डॉ.बागड पुढे म्हणाले की, लेखकांबरोबरच वाचकही समर्थ झाला तर साहित्य अधिकाधिक समृद्ध होत जाते! लेखकाचे स्वातंत्र्य समाजाला प्रगतीच्या व प्रगल्भतेच्या दिशेने नेते म्हणून मित्रांमध्ये बोलतांना जे स्वातंत्र्य आपण घेतो त्या अभिव्यक्ती चे स्वातंत्र्य समाजाने लेखकाला व त्याच्या साहित्यकृतीला दिले पाहिजे’. यावेळी वाचकांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे देत साहित्य, तत्वज्ञान, भाषा, सामाजिक जांण संदर्भात आपली भूमिका मांडली. या प्रसंगी त्यांनी शब्द पब्लिकेशन तर्फे प्रकाशित होऊ घातलेल्या “नवल” या कादंबरीतील उताऱ्याचे वाचन केले.
साहित्यिक गप्पांच्या माध्यमातून साहित्य चळवळी समृद्ध होतात असे मत दिलीप सोनवणे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. नितीन पाटील यांनी केले. डॉ. बागड हे आपल्या साहित्यकृतीच्या माध्यमातून येणाऱ्या काळात मराठी साहित्य विश्वाला एक नवीन वळण देतील असा विश्वास व्यक्त केला. प्रा. लिलाधर पाटील यांनी डॉ. प्रशांत बागड यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन रणजित शिंदे यांनी केले. यावेळी रंगलेल्या चर्चेत कस्तुरी प्रकाशन चे गोकुळ बागुल, ग्रंथालयाच्या उपाध्यक्षा माधुरी भांडारकर, ज साहित्यिक भाऊसाहेब देशमुख, प्रा. दिनानाथ पाटील, प्रा. ज्ञानेश्वर कांबळे, नितीन संदानशिव, स्वप्नील चव्हाण, नयन पाटील, योगेश संदनशिव, प्रा. कृष्णा संदानशिव, भोजराज पाटील, प्रा.प्रमोद चौधरी आदींनी सहभाग घेतला.