तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात या प्रकल्पाला माध्यमिक शिक्षक गटात प्रथम क्रमांक

अमळनेर : स्मार्ट फोनमुळे विद्यार्थी हे ज्ञान मिळविण्याच्या बाबतीत शिक्षकांपेक्षा अधिक गतिशील झाले आहेत. अशा वेळी शिक्षकांना काळाबरोबर विकसीत होणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर मोबाईलचा सकारात्मक उपयोग करून ‘थ्रीडी इमेज’ने अध्यापन प्रभावी व रंजक होते ही बाब विजयनाना पाटील आर्मी स्कूलचे शिक्षक उमेश प्रतापराव काटे यांनी नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मांडली. या प्रकल्पाला माध्यमिक शिक्षक गटात प्रथम क्रमांक मिळाला.
अनेक शिक्षक सोशल मिडियाचा प्रभावीपणे वापर करतात. मात्र, अध्यापनात पाहिजे तसा उपयोग करीत नाहीत. बऱ्याच वेळा अध्यापनाच्या वेळी अनेक शिक्षक मोबाईलवर बोलण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते. ग्रामीण भागातील बऱ्याच जिल्हा परिषद शाळा डिजिटल झाल्या आहेत. त्यामुळे बरेच प्राथमिक शिक्षक तंत्रस्नेही झाले असून, अध्यापनात मोबाईलचा वापर करतात. मात्र, त्या तुलनेने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक कमी वापर करतात ही शोकांतिका आहे. या गोष्टींना तिलांजली देण्यासाठी शिक्षकांमध्ये जनजागृती व्हावी तसेच अध्यापन कौशल्य विकसीत व्हावे या उद्देशाने उमेश काटे यांनी विज्ञान प्रदर्शनात शैक्षणिक साहित्याची मांडणी केली आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांमध्ये याचा प्रचार, प्रसार झाला आहे.
अध्यापनाच्या वेळी शिक्षकांनी ‘थ्रीडी इमेज’च्या साह्याने शिक्षण देताना सुरवातीला संबंधित ‘इमेज प्ले स्टोअर’वर डाऊनलोड करावी. या ‘इमेजला स्कॅन’ केल्यास मोबाईलवर विद्यार्थ्यांसमोर ‘थ्रीडी इमेज’ दिसून येते. मोबाईल हा विद्यार्थ्यांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू असल्यामुळे विद्यार्थी लवकर याकडे आकर्षित होतात. पर्यायाने शिक्षक जे शिकवतात व सांगतात ते विद्यार्थ्यांना अधिक प्रभावीपणे व रंजकपणे समजते. ज्ञान रचनावादाचा वापर करून विद्यार्थी स्वतः या ‘थ्रीडी इमेज’चा अध्ययन अनुभव घेत असल्यामुळे त्यांच्या स्मृतीपटलावर अधिक काळ त्याचा प्रभाव दिसून येतो. युवर बॉडी, ऑर्गन्स थ्रीडी, सर्क्यूलेटर थ्रीडी, ॲनिमल्स फोर डी यासारखे अनेक ॲप्स् अध्यापनात शिक्षकांना मदत करू शकतात. विज्ञान शिक्षकांसोबतच मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित तसेच समाजशास्त्र विषयातील शिक्षकांनाही आपल्या विषयाशी निगडीत अनेक शैक्षणिक ‘ॲप्स प्ले स्टोअर’वर उपलब्ध असून त्याचा वापर करावा.
नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गटशिक्षणाधिकारी आर डी महाजन, शिक्षण विस्तार अधिकारी पी डी धनगर, शापोआ अधीक्षक बी पी चौधरी, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, आर्मी स्कुलचे प्राचार्य एस यु पाटील यांच्यासह अनेक शिक्षकांनी श्री काटे यांच्या या अध्यापन तंत्राचे कौतुक केले. शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव, शिक्षणाधिकारी बी जे पाटील, उपशिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी ही प्रदर्शन स्थळी भेट दिली.