विधानसभेत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची मागणी करत गोंधळ घालणाऱ्या भाजप आमदारांना प्रत्युत्तर

नागपूर : ‘गेली अनेक वर्षे शिवसेना पक्ष आणि पक्षप्रमुख म्हणून मी स्वत: व पक्षावर प्रेम करणारे शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरलो आहोत. पंतप्रधान पीकविमा योजनेतला घोटाळा असेल, शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आलेली अपुरी मदत असेल किंवा कर्जमुक्ती असेल या प्रश्नांवर मार्ग काढण्याचं वचन देऊनच आम्ही सत्तेवर आलो आहोत. शेतकऱ्यांना दिलेला तो शब्द मी पाळणारच आहे’ असे चोख प्रत्युत्तर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी करणाऱ्या व विधानसभेत गोंधळ घालणाऱ्या भाजपच्या आमदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.
हिवाळी आधिवेशनाचा पहिला दिवस सावरकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून गाजल्यानंतर आज दुसऱ्या दिवशीही विधानसभेत विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्या, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केेेली. त्यावर विरोधी बाकावरील सदस्यांनी साथ दिली. काही आमदारांनी विधानसभा अध्यक्षांसमोर घोषणाबाजी सुरू केली. भाजपचे आमदार अभिमन्यु पवार यांनी बॅनर झळकावला. त्यावर अध्यक्षांनी आक्षेप घेतला. मात्र, पवार ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. ते पाहून शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पवार यांच्या हातातील बॅनर काढून घेण्याचा प्रयत्न करताना झटापट झाली व सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आले. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी झालेल्या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘विधानसभेचे सभागृहाला एक समृद्ध वारसा लाभलेला सभागृह असून त्यास काळीमा लागेल, असे वर्तन कोणाही लोकप्रतिनिधीकडून होऊ नये’, असे आवाहन त्यांनी केले. ‘शेतकऱ्यांच्या नावानं राज्याच्या विधानसभेत गोंधळ घालणाऱ्यांचेच सरकार केंद्रात आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टीमुळं राज्यातील शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान भरून देण्यासाठी राज्याने यापूर्वीच केंद्र सरकारकडे साडेपंधरा हजार कोटींची मागणी केली आहे. मात्र, एकही पैसा आलेला नाही. त्यामुळे भाजपवाल्यांनी विधानसभेत शिमगा करण्यापेक्षा केंद्र सरकारकडे जाऊन गळा मोकळा करावा, वाटल्यास गळा मोकळा करण्याची गोळी आम्ही त्यांना देऊ,’ असाही टोलाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.