
पुणे : ज्येष्ठ नाट्य अभिनेते श्रीराम लागू यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी मंगळवारी (ता.१७) रात्री साडे नऊच्या सुमारास वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांचे पार्थिव दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ठेवण्यात येणार असून गुरुवारी पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. डॉ. लागू यांच्या निधनाने मराठी रंगभूमीवरील विवेकवादी नट काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
१९५० च्या दशकात त्यांनी कान नाक घसा यांच्या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेतले आणि पुण्यात ५ वर्षे काम केले. त्यानंतर त्यांनी कॅनडा आणि इंग्लंड येथे पुढील प्रशिक्षण घेतले. वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना श्रीराम लागू यांनी नाटकांत काम करण्यास सुरुवात केली. १९६० च्या दशकात पुणे, टाबोरा, टांझानिया येथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला होता. त्यानंतर भालबा केळकर व इतर समविचारी लोकासमवेत पुरोगामी नाट्य संस्था सुरू केली. भारतात असताना पुरोगामी नाट्यसंस्था, पुणे आणि रंगायन, मुंबई यांच्यामार्फत रंगमंचावरील कामही सुरू होते. १९६९ मध्ये त्यांनी पूर्ण वेळ नाट्य अभिनेता म्हणून वसंत कानेटकर लिखित ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकापासून काम करण्यास सुरुवात केली. सामना, सिंहासन, पिंजरा यासारख्या अनेक सिनेमांमध्ये त्यांनी काम केेेेले होते. मराठी बरोबरच त्यांनी हिंदी सिनेसृष्टीतही त्यांच्या अभिनयाची छाप पाडली. कुसूमाग्रज लिखित ‘नटसम्राट’ या नाटकातली त्यांची अप्पासाहेब बेलवलकर भूमिका विशेष गाजली. आकाश पेलताना, आंधळ्यांची शाळा, आधे अधुरे, इथे ओशाळला मृत्यू, एकच प्याला, कन्यादान, गिधाडे, दूरचे दिवे, लग्नाची बेडी, वेड्याचं घर उन्हात, सूर्य पाहिलेला माणूस आदी नाटकांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या.