अमळनेर न.प.चे नगरसेवक अपात्र प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला नगरविकास मंत्र्यांनी दिली स्थगिती

शहर विकासाचा मार्ग मोकळा झाल्याने अपात्र ठरलेल्या नगरसेवकांमध्ये आनंदाचे वातावरण


अमळनेर : येथील नगरपरिषदेच्या २३ नगरसेवकांना जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या अपात्र प्रकरणाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली आहे. साहजिकच, अमळनेर शहर विकासाचा मार्ग खुला झाल्याने अपात्र ठरलेल्या नगरसेवकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गेल्या मे महिन्यापासून शहर विकास आघाडीचे नगरसेवक अपात्र असल्यामुळे शहरातील विकास कामे ठप्प झाली होती. माजी आमदार शिरीष चौधरी नगरपालिकेचा निधी वळवून बांधकाम विभागाला देत होते. आता नगरपालिकेला विकासकामे करता येणार आहेत. त्यामुळे रखडलेली कामेही मार्गी लागतील.
अमळनेर नगरपरिषदेने केलेल्या अतिक्रमण ठरावप्रकरणी माजी आमदार शिरीष चौधरी गटाचे प्रविण पाठक, सविता संदानशिव व सलीम शेख चिरागोद्दीन शेख या तीन नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. त्यावर तत्कालीन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी कारवाई करून शहर विकास आघाडीच्या शितल राजेंद्र यादव, नूतन महेश पाटील, संतोष भगवान पाटील, सुरेश आत्माराम पाटील, नरेंद्र रामभाऊ संदानशिव, निशांत बानो अनिस खान कुरेशी, मनोज भाऊराव पाटील, गायत्री दिपक पाटील, चेतना ज्ञानेश्वर पाटील, विवेक भिमराव पाटील, निशांत राजेंद्र अग्रवाल, संजय आनंदा मराठे, चंद्रकला अशोक साळुंके, रामकृष्ण बापूराव पाटील, राजेद्र शिवाजी पाटील, कमलबाई पितांबर पाटील, रत्नमाला साखरलाल महाजन, रत्ना प्रकाश महाजन, विनोद रामचंद्र लांबोळे, प्रविण साहेबराव पाटील, सलीम शेख फत्तू, अभिषेक विनोद पाटील या २२ नगरसेवकांना अपात्र ठरविले होते. त्यावर हे नगरसेवक राज्यमंत्र्यांकडे गेले असता, राज्यमंत्र्यांनी स्थगिती दिली होती. त्यानंतर शिरीष चौधरी गटाचे नगरसेवक न्यायालयात गेलेे. त्यावर न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना फेर चौकशीचे आदेश देऊन अहवाल सादर करण्यास सांगितलेे होते. आदेशान्वये, जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी २० मे २०१९ रोजी फेर चौकशी करून पुन्हा २३ नगरसवेकांना अपात्र ठरविले होते. त्यामुळेे हे नगरसेवक पुन्हा राज्यमंत्र्यांकडे स्थगिती मिळविण्यासाठी गेले होते. मात्र, शिरीष चौधरी हे भाजपाचे सहयोगी सदस्य असल्याने स्थगिती मिळू दिली नाही. त्यामुळे शहर विकास आघाडीचे नगरसेवक कोर्टात गेले. त्यावर कोर्टाने शासनाच्या नगरविकास विभागाला आठ दिवसात निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. परंतु या विभागाने निर्णयच घेतला नाही. त्यामुळे शहर विकास आघाडीचे २३ नगरसेवक अपात्र होते.

माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आपल्या कुट राजकीय नितीने शहर विकास आघाडीच्या २२ नगरसेवकांना वेळोवेळी अडचणीत आणण्याचे काम केले. पुन्हा भाजपाची सत्ता येईल या अविर्भावात ते होते. परंतु सत्तेचं राजकीय समीकरण बदलल्याने राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली. लोकनियुक्त नगराध्यक्ष पुष्पलता पाटील यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्र देऊन स्थगिती उठवण्याची मागणी केली होती. त्यावर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. खरे तर, माजी आमदार साहेबराव पाटील यांनी मेरीटने ही स्थगिती मिळवली. यामुळे त्यांचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील, आमदार अनिल भाईदास पाटील, आमदार स्मिता वाघ, किशोर पाटील, आमदार चिमणराव पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, तिलोत्तमा पाटील, सुलोचना वाघ यांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!