होत्याचे नव्हते झाले, पीक घरात येईपर्यंत केलेली मेहनत वाया गेल्याने समोरचे चित्र पाहून झाले हतबल

अमळनेर : तालुक्यातील गांधली येथील सोमा संपत महाजन यांनी चालू वर्षात गांधली शिवारातील त्यांच्या गट नंबर २४५/२ मध्ये १ हेक्टर ७६ आर मालकीच्या शेतात मक्याची पेरणी केली होती. त्यांच्या या शेत गट नंबर २४५/२ मधील संपूर्ण मका जळून खाक झाला आहे.
श्री महाजन यांनी तारीख ३ डिसेंबर २०१९ रोजी मक्याची बुणके मोडून शेतात ढिगारा मारून ठेवला होता. वातावरणातील बदलामुळे त्यांनी मक्याच्या बुणक्यांच्या ढिगारा काही दिवस प्लास्टिक कागद व ताडपत्रीने झाकून ठेवला होता. ता.१७ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत ते शेतातच थांबून होते. रात्री उशिराने घरी आले. ता.१८ रोजी सकाळी ८ वाजता मका काढण्यासाठी थ्रेशर मशीन घेऊन शेताकडे गेले असता, होत्याचे नव्हते झाले. पीक घरात येईपर्यंत केलेली मेहनत वाया गेल्याचे समोरचे चित्र पाहून हतबल झाले. संपूर्ण मक्याच्या ढिगा-याला आग लागलेली होती. सुमारे ९० ते ९५ क्विंटल मका जळून खाक झाला होता. यामुळे दीड ते दोन लाख रुपये किंमतीचे नुकसान झाले. त्यांनी याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला तशी तक्रार नोंदवली आहे. कृषी सहाय्यक, तलाठी, पोलीस पाटील व गावपंच यांचेसमोर पंचनामा करण्यात आला आहे. कुणीतरी अज्ञात इसमाने हे कृत्य केले असावे असा आरोप शेतकरी करीत आहे.