टुरिस्ट/लक्झरी टॅक्सी चालकांना बॅज (बिल्ला) प्रदर्शित करणे आवश्यक

लोकसेवा वाहन चालविण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या नमुन्यातील अधिकारपत्र असणे आवश्यक

जळगाव : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात फ्लिट टॅक्सी व वेब टॅक्सी सेवा देणा-या संस्थांच्या बैठकीत लक्झरी टॅक्सी व टुरिस्ट टॅक्सीच्या चालकांना महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम १ (१) मधील तरतुदीनुसार लोकसेवा वाहन चालविण्यासाठी अधिकारपत्र आवश्यक आहे. अशी माहिती जळगाव येथील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, श्याम लोही यांनी एका प्रसिध्दी प्रत्रकान्वये दिली आहे. तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ४ (१) मधील तरतुदीनुसार लोकसेवा वाहन चालविण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या नमुन्यातील अधिकारपत्र असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ४ (५) मधील तरतुदीप्रमाणे वाहन चालकांसाठी देण्यात येणा-या अधिकारपत्राची नोंद अनुज्ञप्तीमध्ये घेण्यात येत असते. याचबरोबर वाहनातील प्रवाशाला वाहन चालकाकडे अधिकारपत्र असल्याची बाब माहिती होण्यासाठी नियम २४ बिल्ल्याची (बॅज ) तरतूद करण्यात आली आहे. सध्या बस चालकासाठी बिल्ल्याची तरतूद असून कॅब चालकांसाठी बिल्ल्याची तरतूद वगळून ओळखपत्राची तरतूद करण्यात आली आहे. मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम २ (२५) प्रमाणे मोटार कॅबच्या व्याख्येत सहापेक्षा कमी प्रवाशांची भाड्याने वाहतूक करणा-या वाहनाचा समावेश होतो. यामध्ये मीटर्ड टॅक्सी/ऑटोरिक्षा, टुरिस्ट व लक्झरी कॅबचा समावेश आहे.
कॅब चालकांना नियम २४ मधील बिल्ल्याच्या तरतूदीतुन वगळण्यात आले असले तरी त्यांना नियम ४ (५) प्रमाणे त्यांच्या अनुज्ञप्तीमध्ये अधिकारपत्राची नोंद करुन घेणे व त्यासाठी नियम ४ व नियम २४ मधील तरतुदींची (उदा.वैद्यकीय दाखला, एस.ई.सी. प्रमाणपत्र, चारित्र्य प्रमाणपत्र, स्थानिक भौगोलिक परिस्थितीचे ज्ञान व स्थानिक भाषेचे ज्ञान) पूर्तता करणे आवश्यक आहे.
मोटार कॅबचा चालक व प्रवासी बसचा चालक यांना लोकसेवा वाहन चालविण्याचे अधिकारपत्र व मोटार कॅबचा चालक सोडून अन्य लोकसेवा वाहनाच्या चालकाने (बस) त्याला दिलेला धातूचा बिल्ला व मोटार कॅबच्या चालकाने महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम २१ (१८) अन्वये विहीत केलेले ओळखपत्र छातीवर लावणे नियमानुसार आवश्यक आहे. मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम ८८ (९) अन्वये देण्यात आलेल्या पर्यटक परवान्यावरील वाहन चालविण्या-या चालकांची पात्रता कलम ८८ (११) मधील तरतुदीनुसार केंद्र शासनाच्या दि.८ जून, १९८९ च्या अधिसूचनेनुसार नमुद करण्यात आली आहे. तथापि, या तरतुदीमुळे महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ मधील लोकसेवा वाहन चालविण्याच्या अधिकारपत्राबाबतच्या तरतूदी गैरलागू होत नाहीत.
महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ च्या नियम २४ (२) मध्ये लक्झरी कॅब व टुरिस्ट कॅब चालक अनुक्रमे LCD व TCD नमुन्यातील बॅज प्रदर्शित करतील असा उल्लेख आहे. परतु त्याचा नमुना ठरविण्यात आलेला नाही. लक्झरी व टुरिस्ट कॅब चालकासाठी अधिकारपत्र प्राप्त करणे व त्याची नोंद अनुज्ञप्तीमध्ये करणे आवश्यक आहे. याबाबत अनुज्ञप्ती धारक (बॅज ) यांनी नोंद घ्यावी असे आवाहन श्याम लोही, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी प्रत्रकान्वये केले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!