जिल्हा परिषद शाळा दोधवद, कलाली व माध्यमिक विद्यालय दोधवद यांचे संयुक्त विद्यमाने कार्यक्रम

अमळनेर : तालुक्यातील अमळगाव केंद्राची शिक्षण परिषद अमळगाव केंद्राचे केंद्रप्रमुख आबासाहेब गोकुळ आनंदा पाटील यांचे अध्यक्षतेखाली शुक्रवार, ता.२० रोजी जिल्हा परिषद शाळा दोधवद, कलाली व माध्यमिक विद्यालय दोधवद यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गांधली-पिळोदे येथे उत्साहात संपन्न झाली. व्यासपीठावर सुरेखा पाटील, सुरेखा देसले, गोकूळ साळुंखे, दत्तात्रय सोनवणे, योगेश चौधरी व रविंद्र चव्हाण उपस्थित होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गांधली-पिळोदे येथील विद्यार्थ्यांनी नियोजनानुसार ईशस्तवन, स्वागतगीत व आदर्श परिपाठ सादर केला. तसेच आनापान कार्यक्रमांतर्गत ध्यान व मौन साधना याबाबत माहिती सांगून प्रात्यक्षिक करुन घेण्यात आले.
जिल्हा परिषद शाळा, गांधली-पिळोदे येथील उपशिक्षिका महानंदा सूर्यवंशी यांनी ज्ञानरचनावादावर आधारीत इयत्ता पहिली गणित विषयाचा पाठ साहित्याचा वापर करुन रंजक पध्दतीने सादर केला. ज्ञानरचनावाद पध्दतीमुळे विद्यार्थ्यांचा सहभाग व प्रतिसाद सर्वांचे लक्ष वेधून घेणारा होता. गाडगे महाराज पुण्यतिथीचे औचित्य साधून उपशिक्षिका नुतन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी प्रसंगोपात्त उपक्रम केला. बाबांच्या साध्या वेशातील बालकलाकाराने संत गाडगेबाबांच्या जीवनावर आधारीत प्रबोधनपर किर्तन “गाेपाला गोपाला देवकीनंदन गोपाला” प्रश्नोत्तर व संवादात्मक शैलीत सादर केले. बालकिर्तन उपस्थितांना भावले. बालकिर्तनास उपस्थितांकडून भरघोस बक्षीस मिळाले. शिष्यवृत्ती परिक्षा तयारीबाबत गणित व बुध्दिमत्ता विषयातील भौमितिक आकृत्या, आरशातील / पाण्यातील प्रतिमा इ.वरील उदाहरणे विविध सूत्रे व क्लृप्त्यांच्या आधारे चटकन सोडवता येतील तसेच मुख्य व शिष्यवृत्ती परिक्षेपुर्वी सराव प्रश्नपत्रिकाद्वारे विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा करुन घेता येईल. याबद्दलचे उदबोधन सतिश पाटील यांनी अतिशय सोप्या पध्दतीने केले. इंग्रजी साहित्य पेटीतील विविध साहित्याचा वापर करुन इंग्रजीची भिती कशी घालवता येईल? तसेच साहित्य हाताळणी, वापर व उपयुक्तता याबाबत मगन चौधरी यांनी माहिती दिली. माहिती तंत्रज्ञानाचा अध्यापनातील उपयोग तसेच ज्ञानरचनावाद याद्वारे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या संकल्पना कशा स्पष्ट करुन देता येतील. गणित विषयाची भिती कशी कमी करता येईल? १००% विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी कोणकोणते उपक्रम राबवता येतील याबाबत चंद्रकांत देसले यांनी माहिती दिली. NAS, PGI, U-Dise+, अध्ययन निष्पत्तीवर आधारीत प्रश्न निर्मिती, शाळासिध्दी, तंबाखूमुक्त शाळा, शिष्यवृत्ती परिक्षा व नवोदय परीक्षा याबाबत तसेच इतर प्रशासकीय विषयांवर केंद्रप्रमुख गोकूळ पाटील यांनी सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेमराज पवार व आभार प्रदर्शन रविंद्र चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेखा पाटील, रमेश पारधी, रविंद्र पाटील, अशोक मोरे, संजय शिंदे, नुतन पाटील, महानंदा सुर्यवंशी, सुनंदा सोनगीरे, संजय महाजन, गोकुळ साळुंखे, जितेंद्र शेटे, चंद्रकांत देसले, सतिष पाटील, प्रेमराज पवार, रविंद्र चव्हाण, गुलाब शिरसाठ, निता बडगुजर, भानुदास सैंदाणे, प्रशांत देसले व योगेश चौधरी यांनी विशेष प्रयत्न केले.