
अमळनेर : दरवर्षी येेेथील प्रताप महाविद्यालयातील स्नेह संमेलन श्रीमंत प्रतापशेठजी यांची पुण्यतिथी व मातृ हृदयी साने गुरुजी यांची जयंती चे औचित्य साधून आयोजित करण्यात येते. महाविद्यालयाने यावर्षी सुद्धा स्नेह संमेलनाची जय्यत तयारी केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे हा स्नेह संमेलनाचा उद्देश असतो. त्यासाठी महाविद्यालयांत विविध समित्यांचे काम वेगात सुरू आहे. यात.. रंगमंच व साऊंड सिस्टीम, विविध मनोरंजन, नाट्य एकांकिका, शेला पागोटे, शिस्त, फॅन्सी ड्रेस व विविध स्पर्धा, निबंध, वक्तृत्व कथाकथन, बैठक व्यवस्था, रांगोळी, केशरचना, मेहंदी स्पर्धा, आनंद मेळावा व रेकॉर्ड भेट, क्रिडा, पाककला, स्वीट डिश सलाद स्पर्धा, काव्य वाचन, पारितोषिक व प्रमाणपत्र वितरण, फाईन आर्टस गॅलरी आणि प्रसिद्धी समिती आदी समित्यांचा समावेश आहे.
तारीख २४ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता ध्वजारोहन होऊन स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन समारंभाला सुरुवात होईल. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी खा.शि.मंडळाचे कार्याध्यक्ष प्रदीप अग्रवाल तर उद्घाटक म्हणून कल्याण येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.सौ.राखी प्रशांत जाधव असतील. प्रमुख अतिथी म्हणून जळगाव जनता सहकारी बँकचे माजी अध्यक्ष संजय बिर्ला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय विशेष अतिथी म्हणून आमदार अनिलदादा पाटील, माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील, नगराध्यक्षा सौ.पुष्पलता साहेबराव पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे. यावेळी व्यासपीठावर खा.शि.मंडळाचे सर्व संचालक मंडळ व पदाधिकारी उपस्थित असतील. उद्घाटन कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांच्या ललित कलागुणांच्या आविष्काराचे प्रदर्शन असणाऱ्या फाईन आर्ट गॅलरीचे उद्घाटन होईल. यासोबतच विद्यार्थ्यांसाठी गाण्याची धमाल रेकॉर्ड भेट होईल. दुपारी २ वाजता ऑर्केस्ट्रा, गीत गायन, नृत्य, मिमीक्री यांचा समावेश असलेले विविध मनोरंजनाचे कार्यक्रम विद्यार्थी सादर करतील.
तारीख २५ डिसेंबर रोजी सकाळी फॅन्सी ड्रेस स्पर्धा, काव्य वाचन स्पर्धा तसेच नाटिका व एकपात्री प्रयोग विद्यार्थी सादर करतील. सायंकाळी ५ वाजता ‘चला हवा येऊ द्या’ फेम कॉमेडी शो अभिनेता ज्युनिअर मकरंद अनासपुरे हा कार्यक्रम सादर होईल. यानंतर ६ वाजता ‘असणं….. नसणं’ ही पुरुषोत्तम करंडक एकांकिका प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थी सादर करतील. तारीख २६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता बक्षिस वितरण, शेला पागोटे आणि समारोपाचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.शि.मंडळाचे कार्योपाध्यक्ष संदेश गुजराथी तर प्रमुख अतिथी म्हणून पुणे येथील प्रख्यात डॉक्टर सौ.गौरी शुक्ल रानडे तसेच शेंदुर्णी महाविद्यालयाचे प्रा डॉ श्याम साळुंखे असणार आहेत. याशिवाय विशेष अतिथी म्हणून विधानपरिषद आमदार स्मिताताई वाघ व माजी आमदार शिरीषदादा चौधरी उपस्थित राहणार आहेत.
स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी प्राचार्या, उपप्राचार्य, सर्व समिती प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी परीश्रम घेत आहेत. खा.शि.मंडळाचे कार्याध्यक्ष, कार्योपाध्यक्ष तसेच सर्व व्यवस्थापन मंडळाचे मार्गदर्शन लाभत आहे. स्नेहसंमेलनातील विविध कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे व विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन प्राचार्या डॉ.ज्योती राणे, स्नेह संमेलन प्रमुख प्रा.ललिता पाटील, प्रा.आर.एम.पारधी, सचिव प्रा.डॉ.ए.बी.जैन तसेच खा.शि.मंडळाचे कार्याध्यक्ष आणि संचालक मंडळाने केले आहे.