श्रीलंका व ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या मालिकांसाठी भारतीय संघ जाहीर; दोन खेळाडूंचे पुनरागमन

रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती तर जसप्रीत बुमराह आणि शिखर धवन यांचे पुनरागमन

नवी दिल्ली : जानेवारी-फेब्रुवारी २०२० मध्ये श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरूद्ध होणाऱ्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. भारतीय संघात रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी या दोघांना विश्रांती देण्यात आली आहे, तर जसप्रीत बुमराह आणि शिखर धवन यांचे पुनरागमन झाले आहे. भारताची श्रीलंकेविरूद्ध ५ जानेवारीपासून तर ऑस्ट्रेलियाविरूद्ध १४ जानेवारीपासून क्रिकेट मालिका सुरू होणार आहे. या दोन मालिकांसाठी बीसीसीआय ने सोमवारी संघाची घोषणा केली आहे. एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील ५ सदस्यीय समितीने नवी दिल्ली येथे या संघाची घोषणा केली.

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा दुखापतग्रस्त असल्यामुळे बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. पाठीच्या दुखापतीमुळे त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. विश्रांती आणि उपचार घेतल्यानंतर वेस्ट इंडीजविरूद्धच्या एकदिवसीय सामन्याआधी त्याने नेट्समध्ये गोलंदाजी केली होती. पूर्णपणे तंदुरूस्त झाल्यानंतर त्याचे संघात पुनरागमन झाले आहे. भारताचा सलामीवीर शिखर धवन देखील दुखापतीमुळे वेस्ट इंडीजविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेला मुकला होता. त्याचेही श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या या मालिकांसाठी संघात पुनरागमन झाले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!