अमळनेर : सानेगुरुजींनी ‘जगाला प्रेम अर्पावे’ ची शिकवण दिली असे सांगत चांगला माणूस बनून प्रेम हाच आपला धर्म मानावा. चांगला माणूस होण्यासाठी समता महत्वाची असल्याचे मत ज्येष्ठ लेखिका तथा संपादिका प्रा.डॉ. गीताली विनायक मंदाकिनी यांनी व्यक्त केले. येथील साने गुरुजी कर्मभुमी स्मारक प्रतिष्ठान व शिवशाही फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार (ता.६) रोजी जी. एस. हायस्कुलच्या आयएमए हॉलमध्ये पत्रकार दिनाचे औचित्य साधून पार पडलेल्या कार्यक्रमात प्रा. डॉ. गीताली विनायक मंदाकिनी (पुणे) या “माध्यमे व स्त्री-पुरुष समानता” या विषयावर व्याख्यानात बोलत होत्या.
विचार मंचावर अध्यक्षस्थानी साने गुरुजी कर्मभुमी स्मारक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.डॉ. ए.जी.सराफ यांचेसह शिवशाही फाऊंडेशनचे अध्यक्ष जयेशकुमार काटे होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पूज्य साने गुरुजी व दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन आयोजकांतर्फे मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. पत्रकार दिनाच्या पार्श्वभुमीवर पत्रकारांना सन्मानपत्र व भेटवस्तू देवून सन्मान करण्यात आला.
प्रा.डॉ.गीताली पुढे म्हणाल्या की, ‘समानता म्हणजे केवळ सारखेपणा नव्हे, सर्वव्यक्ती समान प्रतिष्ठेची असणं म्हणजे समानता होय’ अशी समानता आजच्या स्त्री पुरुषांमध्ये आली पाहिजे तरच समाज खऱ्या अर्थाने प्रबळ होईल. स्त्री-पुरुष हे एकमेकास विरुद्ध नसून ते परस्पर पूरक आहेत. लग्नापूर्वी स्त्रीचे पालक वडील असतात म्हणून त्यांच्या नावानंतर वडिलांचे नाव लागते. मात्र लग्नानंतर नवरा हा बायकोचा पालक नसून जोडीदार असायला पाहिजे. पुरुषांनीही स्रियांसारखं त्यागी,सोशिक का असू नये ? व्यवस्था ही लिंगाधिष्ठित आहे, म्हणून स्त्रीला दुय्यम स्थान दिलं गेलं. त्यामुळे बायकांच्या मनात न्यूनगंड निर्माण झाला. तश्या पध्दतीने ते आजही ते न्यूनगंड घेऊन वावरत आहेत. स्त्री बरोबर पुरुषांनेही मुलांचं संगोपन केले पाहिजे. सगळ्यांनी चांगला माणूस होणं गरजेचं आहे.
अध्यक्षीय भाषणात डॉ.सराफ म्हणाले की, अमळनेर साने गुरुजीची कर्मभूमी आहे. सानेगुरुजींनी जगाला प्रेम करण्याचं शिकवलं म्हणून सानेगुरुजींच्या विचारांचा जागर करण्याची गरज आहे. हा जागर सुरुवातीला आपल्या शहरापासून होणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. प्रास्ताविक साने गुरुजी कर्मभुमी स्मारक प्रतिष्ठानच्या कार्यवाहक दर्शना पवार यांनी केले. शिवशाही फाऊंडेशनचे सचिव उमेश काटे यांनी मान्यवरांचा परिचय करुन दिला. सूत्रसंचालन शरद पाटील यांनी तर आभार जयेशकुमार काटे यांनी मानले.

