अमळनेरच्या शिवाजी उद्यानात पत्रकार दिन साजरा

वर्षभरात पत्रकार भवन उभे राहावे यासाठी आमदार अनिल पाटील प्रयत्न करणार.

अमळनेर : पत्रकार दिन असो वा अन्य कार्यक्रम असो, पत्रकारांना एकत्र येण्यासाठी हक्काची अशी जागा नाही. आतापर्यंत भव्य पत्रकार भवन उभारण्याची काहींची फक्त चर्चाच ठरली. मात्र, आता वर्षभरात भव्य नसले तरी साजेसं असं पत्रकार भवन उभारले जाईल अशी अपेक्षा व्यक्त करीत तालुक्यातील सर्व पत्रकार, प्रेस फोटोग्राफर साठी पत्रकार भवन उभे करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी सांगितले. शहर पत्रकार संघातर्फे येथील शिवाजी उद्यान येथे सालाबादाप्रमाणे ता.६ रोजी पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमास व्यासपीठावर आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, पंचायत समिती सभापती रेखाताई पाटील, तिलोत्तमा पाटील, सुलोचना वाघ, नगरसेवक मनोज पाटील, गोकुळ बोरसे, पराग पाटील, ज्येष्ठ पत्रकार गं.का.सोनवणे, बाजार समिती सभापती प्रफुल्ल पवार, अर्बन बँकेचे चेअरमन पंकज मुंदडा, खा.शि.मंडळाचे अध्यक्ष प्रदीप अग्रवाल, विनोदभैय्या पाटील, सुभाष चौधरी, प्रताप शिंपी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डिगंबर महाले यांनी केले. ज्येष्ठ पत्रकार असलेले स्व.उदय वाघ आणि माजी आमदार स्वर्गीय अमृतराव पाटील यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सुरुवातीस पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष राजेंद्र पोतदार, किरण पाटील व चंद्रकांत काटे यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केल्यावर मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन माल्यार्पण करण्यात आले. पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, सचिव चंद्रकांत पाटील, जितेंद्र ठाकूर, उमेश काटे, महेंद्र रामोशे आदी पत्रकारांकरवी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

आमदार पाटील पुढे म्हणाले की, पत्रकार समाजाला जागे करण्याचे काम करीत असतो. मी जो आमदार झालो तो केवळ जनतेमुळे. जनतेला जागे करण्याचे काम पत्रकारांनी केले. पत्रकार वेळ काळ न पाहता बातम्यांसाठी धडपडत असतो. वेळप्रसंगी एखाद्याचा रोषही पत्करतो. पण त्यास विश्रांतीसाठी हक्काचे ठिकाण नाही. मागील पत्रकारदिनी कोणी काय आश्वासने दिली, काय झाले ? हे सांगण्याची गरज नाही. मात्र आता नगरपालिकेने जागेची उपलब्धता करुन दिल्यास काहीसा निधी मिळवून पत्रकार भवनासाठी हा शेवटचा प्रयत्न करु अन्यथा.. नादच नको असेही त्यांनी स्पष्ट केले. अर्थ व जलसंपदा खाते राष्ट्रवादी पक्षाकडे असल्याने आता पाडळसरे धरणास गती देण्याचीही ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

आतापर्यंत पत्रकार भवन व्हायलाच हवे होते : माजी आमदार शिरीष चौधरी

कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात माजी आमदार शिरीष चौधरी व मित्र परिवारातील गटनेते प्रविण पाठक, सुनिल भामरे, बाळा संदानशिव, धनराज महाजन, पंकज चौधरी आदींनी कार्यक्रमस्थळी भेट देवून पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. आतापर्यंत पत्रकार भवन व्हायलाच हवे होते. त्यात कोणी खीळ घातली ? हे तुम्हाला माहिती आहे असे सांगून माजी आमदार यांनी शेवटही सकारात्मक केला.

कार्यक्रमात माजी आमदार साहेबराव पाटील, रेखाताई पाटील, तिलोत्तमा पाटील, पराग पाटील, पंचायत समितीचे अधिकारी संदीप वायाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पत्रकार राजेंद्र पोतदार, संजय पाटील, चंद्रकांत काटे, उमेश काटे, बाबूलाल पाटील, ईश्वर महाजन, जयश्री दाभाडे, डिगंबर महाले यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्व पत्रकारांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. शहर व ग्रामीण विभागातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर व सर्व पत्रकार बंधू भगिनी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनी पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन संजय पाटील यांनी तर पंडीत चौधरी यांनी आभार मानले. कार्यक्रमास मंगलमूर्ती टेंट चे राजेंद्र वाणी, ईश्वर बडगुजर यांचे सहकार्य लाभले

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!