श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थानच्या संकेतस्थळाचा शुभारंभ

अमळनेर : आजच्या डिजिटल युगात सोशल मिडिया व वेबसाईट प्रसाराचे मुख्य साधन बनले असल्याने नव्या पिढीसह कोणासही तत्काळ माहिती उपलब्ध व्हावी हा उद्देश ठेवून येथील श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थानात www.sakharammaharaj.org हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. विद्यमान गादीपती प.पूज्य प्रसाद महाराज यांच्या हस्ते नुकताच (ता.६) रोजी संकेतस्थळाचा शुभारंभ करण्यात आला.

अमळनेर येथील श्री संत सखाराम महाराज संस्थान व श्री विठ्ठल रुख्मिणी संस्थान हे खानदेशातच नव्हे तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. गेल्या दोनशे वर्षांहून अधिक काळापासून अमळनेरला प्रति पंढरपूर म्हटले जाते. श्री सखाराम महाराज व त्यांच्या परंपरेतील महाराजांनी चालू ठेवलेल्या धार्मिक व भक्ति मार्गातील तत्त्वनिष्ठ कार्य पद्धतीमुळे याची महती संपूर्ण महाराष्ट्रात तळागाळातील लोकांपर्यंत व्हावी या उद्देशाने या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे.

संकेतस्थळ लक्ष्मीकांत सोनार यांनी तयार केले असून या संकेतस्थळावर संत सखाराम महाराजांचा जीवनालेख, त्यांचे चरित्र, त्यांचे ग्रंथ, विविध सन्मान, दुर्मिळ छायाचित्रे, संत परंपरा अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. श्री सखाराम महाराजांपासून सुरु झालेली ही परमार्थाची गंगा त्यांच्या नंतर त्यांच्या गादीवर आलेल्या सत्पुरुषांनी वाहती ठेवली आहे. यामुळे तेथे सतत भजन, किर्तन, प्रवचन इत्यादी कार्यक्रम सुरु असतात. श्री सदगुरु विठ्ठल रुख्मिणी संस्थांनाच्या माध्यमातून सतत धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक असे बरेच उपक्रम राबवले जातात. संस्थानचे नित्य चालणाऱ्या कार्यक्रमात सर्व भक्तांनी सहभाग घेण्यात व ऑनलाईन देणगी देण्याची सुविधा पुरवण्यात संकेतस्थळाची मदत होईल. यावेळी संस्थेचे विश्वस्त जयंत मोडक, आप्पा येवले व भक्तगण आदी उपस्थित होते.

.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!