पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संदीप वायाळ यांचे आवाहन

अमळनेर : तालुक्याला हागणदारी मुक्त करण्यासाठी आजपर्यंत ६६ लोटाबहाद्दरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उघड्यावर शौचाला जाणाऱ्यांवर आजपर्यंत महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ११५ व ११७ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, पण उघड्यावर शौचाला जाण्याचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही. तरी ज्या कुटुंबांकडे अजूनही शौचालयाचे बांधकाम केलेले नाही त्यांनी आपले आधार कार्ड ग्रामसेवकाकडे जमा करावे. संबंधित सरपंच व ग्रामसेवक यांनी तात्काळ गावातील शौचालय नसलेल्या कुटुंबाचे सर्वेक्षण करून ग्रामसभेच्या ठरावासह संबंधित लाभार्थ्यांची नावे पंचायत समिती मधील स्वच्छ भारत कक्षात जमा करावीत जेणेकरुन तालुक्यातील एकही कुटुंब शौचालयापासून वंचित राहणार नाही. वेबसाईट कधीही बंद होऊ शकते त्यामुळे ही कार्यवाही दिनांक १० जानेवारी २०२० पर्यंत होणे अपेक्षित आहे. शौचालय नसलेल्या कुटुंबांना शौचालय देऊन पण उघड्यावर शौचाला जाणाऱ्यांवर वरील नमूद कायद्याच्या सोबतच भारतीय दंड संहिता कलम २६९ अंतर्गत कारवाई करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी. यामध्ये १२०० रुपये दंडात्मक रक्कम आणि सहा महिने तुरुंगवास ही होऊ शकतो याची गांभीर्याने नोंद घ्यावी. व २० जानेवारी पासून महिलांवरही गुन्हे दाखल करण्यात येतील व उघड्यावर शौचाला जाणाऱ्या कुणाची ही गय केली जाणार नाही. असे अमळनेर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संदीप वायाळ यांनी कळविले आहे.