पातोंडा येथे माहिजी देवी यात्राेत्सवास सुरुवात; महाप्रसादाचे आयोजन

अमळनेर : तालुक्यातील पातोंडा येथील ग्रामदेवता लघु माहिजी देवी यात्राेत्सवाला पौष शुद्ध पोर्णिमेपासून (ता.१०) सुरुवात होत आहे. आज ता.९ रोजी पौष शुद्ध चतुर्दशी ला देवीचा पालखी सोहळा मिरवणूकीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. मिरवणूक मार्गात ग्रामस्थांनी स्वच्छता करून रस्त्यावर व अंगणात आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. पालखीत देवीचा फोटो व पादुका दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. ग्रामस्थांसह महिलांनी पालखीचे पूजन करुन दर्शन घेतले. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे पूर्वीपासून देवीचा मान म्हणून तगतराव काढण्याची प्रथा आहे. प्रथेनुसार यात्रेच्या दिवशी संध्याकाळी तगतराव काढण्यात येणार असून रात्री तमाशा चा कार्यक्रम आयोजित केला आहे.

गावाच्या उत्तरेस लघु माहिजी देवीचे उंच कळस असलेले पुरातन मंदिर आहे. मंदिरात एकाच दगडावर देवीची सुरेख कोरीव मूर्ती आहे. त्याकाळी दानशूर प्रतापशेठ यांनी मंदिर बांधले होते. मंदिर परिसरात राम, सीता, लक्ष्मण, नावाड्या यांचा जहाजावर बसलेला सुंदर देखावा आहे. सद्यस्थितीत मंदिराचा सभामंडप व अन्य विकास कामे लोकवर्गणीतून सुरु आहेत. मंदिराला रंगरंगोटी, आकर्षक रोषणाई, पाण्याची सुविधा, हायमास्ट लॅम्प, भाविकांना नवस फेडण्यासाठी लागणारी जागा, स्वच्छता अशा सुविधा तिर्थक्षेत्र श्री माहिजी देवी देवस्थान व ग्रामपंचायत मार्फत करण्यात आल्या आहेत. देवीचा नवस फेडण्यासाठी भाविक चावदस व पौर्णिमेला येत असतात. यात्रोत्सव काळात देवीचे दर्शनच नव्हे तर जलसा व तमाशा पाहण्यासाठी हजारो भाविक मोठ्या संख्येने येत असतात.

थोडक्यात अख्यायिका अशी की, प्राचीन काळी देवी मंदिराचे जागेवर वडाचा मोठा वृक्ष होता. या वृक्षा खाली पर्णकुटीत उदासी नावाचे तपस्वी राहत असत. सप्तशृंगी देवीला सात बहिणी होत्या. सर्वात लहान बहिणीचे नाव माहिजी देवी असे होते. देवी परिसरातील शेत जमिनीची मशागत करतांना एका शेतकऱ्याला त्रिशूल आकाराचे तीन दगडाचे बाण सापडले. माहिजी देवीच्या हातात त्रिशूल बाण असायचे. सर्वात लहान व हातात त्रिशूल बाण यामुळे देवीला लघु माहिजी देवी म्हणून ओळखले जाऊ लागले. पूर्वज या बाणाला लघु माहिजी देवी म्हणून ओळखत. असे त्या काळी उदासी नावाचे तपस्वी महाराज सांगत असत. पाचव्या पिढीपासून देवीची सेवा करणारे गुरव घराण्यातील आजचे सेवक आर.टी.गालापुरे (गुरव) हे सुद्धा अशीच अख्यायिका आजही सांगतात. यात्रेच्या दिवशी लोकवर्गणीतुन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी यात्रोत्सवात शिस्तीचे पालन करावे व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन देवस्थान समितीने कळविले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!