बिनविरोध निवडणूक हीच खऱ्या अर्थाने आदर्श गावाची वाटचाल : आमदार अनिल पाटील

अमळनेर : गावातच नव्हे तर कुटुंबात कटुतेचे प्रसंग निवडणूकीत येतात. वेळ व पैसा याची हानी होते. मात्र बिनविरोध निवडणूक हीच खऱ्या अर्थाने आदर्श गावाची वाटचाल आहे असे प्रतिपादन आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केले. रणाईचे खुर्द येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्याने नवनियुक्त सरपंच, व अन्य पदाधिकाऱ्यांचा सत्कार कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. रणाईचे येथे तांड्यात प्रथमच रणाईचे खुर्द म्हणून स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळाल्याने येथील सर्व बंजारा समाज बांधवानी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. निवडणूक बिनविरोध झाली. मात्र या गावात ग्रामपंचायत इमारत नसल्याचे गटविकास अधिकारी जाधव यांनी आमदार अनिल पाटील यांना सांगितल्याने दोन दिवसात इमारतसाठी निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. गावाला विकासासाठी सर्वतोपरी निधी देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांत सरपंच पदी प्रकाश चव्हाण, तर सदस्यपदी मिश्रीलाल बंजारा, राजू बंजारा, रामचंद्र चव्हाण, कलीबाई पवार, बालुबाई राठोड, कस्तुरा बंजारा, प्रिया बंजारा यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
गटविकास अधिकारी सुभाष जाधव म्हणालेेे की, लोकप्रतिनिधी हा सजग व संयमी असावा. सतत पाठपुरावा सुरू ठेवल्यास शासनाच्या योजना दारापर्यंत आणता येतात. गावचा विकास आणि तंटामुक्ती गाव हे ध्येय ठेवल्यास नक्कीच गावाचा कायापालट होण्यास मदत होईल असे सांगत शासनाच्या विविध योजनांची त्यांनी माहिती दिली. यावेळी श्याम अहिरे, हिरालाल पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सत्कार कार्यक्रमास पंचायत समिती सभापती रेखा पाटील, गटविकास अधिकारी सुभाष जाधव, पंचायत समितीचे माजी उपसभापती श्याम अहिरे, भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष उमेश वाल्हे, मिलिंद पाटील, प्रा.श्याम पवार, बी.के.सूर्यवंशी, जी.व्ही.पाटील, दादा पवार, बाळासाहेब पाटील, भूषण पाटील, जिजाबराव पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी रमेश चव्हाण, श्रावण राठोड, सुभाष राठोड, छगन राठोड, गुलाब राठोड, रसाल राठोड, मोरसिंग पवार, भाईदास राठोड, रामचंद्र चव्हाण आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.हिरालाल पाटील यांनी तर रमेश चव्हाण यांनी आभार मानले.