खान्देशातील सात शिक्षक राज्यस्तरीय ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित

वडीलधाऱ्यांचा कायम सन्मान राखल्यास पुरस्काराची खऱ्या अर्थाने सार्थकता वाढेल : प्रा.डॉ.वाल्मिक सरवदे

अमळनेर : राज्यभरातील शिक्षकांनी जीवन गौरव शिक्षक पुरस्काराचे साक्षीदार होण्यासाठी सोबत आणलेल्या ज्येष्ठांचा, वडीलधाऱ्यांचा सन्मान राखण्याची भूमिका कायम ठेवली तर या पुरस्काराची खऱ्या अर्थाने सार्थकता वाढेल असे प्रतिपादन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता प्रा.डॉ.वाल्मिक सरवदे यांनी केले. शासनमान्य बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन व जीवन गौरव सार्वजनिक वाचनालयातर्फे राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार वितरण व राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे बक्षीस वितरण १३ जानेवारी रोजी तापडिया नाट्यगृहात मासिक ‘जीवन गौरव’च्या चौथ्या वर्धापनदिनी झाले. राज्यातील ५३ शिक्षकांना व निबंध लेखन स्पर्धेतील १५ विजेत्या शिक्षकांना ‘जीवन गौरव’ पुरस्काराने प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा.डॉ.वाल्मिक सरवदे बोलत होते.

पुरस्कार वितरण सोहळ्याचे उद्घाटन प्रा.डॉ.सोमनाथ वाघमारे यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर उपशिक्षणाधिकारी आश्विनी लाठकर, प्रा. सुनील मगरे, जालिंदर शेंडगे, डी.आर.रोडगे, दिलीप जऊळकर, डॉ.प्रविण चाबूकस्वार, डिगंबर शिंदे, संदिप सोनवणे, प्रा. संपत गर्जे, गणेशसिंह चंदेल आदी उपस्थित होते. यात खान्देशातून दत्तात्रय सोनवणे (पिंगळवाडे ता.अमळनेर), विलास निकम (लोहारा ता.पाचोरा), दर्शना चौधरी (शिरुड ता.अमळनेर), आबा पाटील (मांडवेदिगर ता.भुसावळ), प्राचार्य डॉ.वैशाली शिंदे (नंदुरबार), सिमा मोडक (नंदुरबार), भगवान खानोरे (शहादा) या सात शिक्षकांना पुरस्कार देण्यात आला. शाहिर प्रा.प्रविण जाधव यांच्या शाहिरीने कार्यक्रमात रंगत आणली.

डॉ. सरवदे पुढे म्हणाले की, शिक्षक हा नवी पिढी घडवतो. नवी पिढी घडवताना अनेक चढउतारांना सामोरे जावे लागते. वैयक्तिक सुख दु:खापेक्षा अध्यापन सेवेशी एकनिष्ठ राहणाऱ्या या शिक्षकांना सन्मानित केले पाहिजे. त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली पाहिजे, या हेतूने ‘जीवन गौरव’ पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान होत आहे. या सोहळ्यासाठी शिक्षकांनी एकटे येणे पसंत केले नाही तर त्यांनी इतरांनाही सोबत आणले आहे. त्यामुळे या पुरस्काराची सार्थकता त्यांनी वाढविली आहे. त्यात सातत्य राखले पाहीजे. ‘जीवन गौरव’ पुरस्काराने या शिक्षकांची जबाबदारी वाढली आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

उपशिक्षणाधिकारी आश्विनी लाटकर यांनी पुरस्कार सोहळ्याची व ‘जीवन गौरव’ मासिकाची प्रशंसा करीत मासिकाच्या प्रगतीसाठी व ‘जीवन गौरवला’ सर्वतोपरी सहकार्य करत राहील अशी ग्वाही दिली. प्रा.सुनिल मगरे यांनी समयोचित भाषण केले. प्रास्ताविक भाषणात ‘जीवन गौरवचे’ मुख्य संपादक रामदास वाघमारे यांनी चार वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. शिक्षकांना लिहते करण्याचे उद्दिष्ट सफल झाले असे त्यांनी नमूद केले. संदीप ढाकणे व भाग्यश्री इसलवार यांनी सूत्रसंचालन केले. साेहळ्यास फाऊंडेशनच्या सचिव मीरा वाघमारे, अंन्सीराम वाघमारे, अशोक निकम, चंदू अजादे, प्रेरणा अजादे, अमर सपाटे, संजय अचलखांब, श्रीकांत कुंभार, संजय हिंगोलीकर, कल्याण अन्नपुर्ण, जगन्नाथ सुपेकर, अनिल कचरे, अरुण सुरडकर, गणेश पवार, ऋत्विक वाघमारे, दीपक वाघमारे, प्रणाली वाघमारे, गौरव वाघमारे व राज्यभरातील जीवन गाैरवच्या टिमने सहकार्य केले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!