अमळनेर : येथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक अनिल भाईदास पाटील यांनी मंगळवारचा मुहुर्त साधत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी मंगळग्रह देवास नारळ वाढवून दर्शन व आशिर्वाद घेतले. शहरातील मुख्य रस्त्यावर ढोलताशांच्या गजरात भव्य रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. मतदार संघातील हजाराे महिला, पुरुषांसह रॅली काढून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी ‘अनिल दादा आगे बढो… ‘ , ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो ‘ या घोषणांनी शहर दणाणून गेले होते. त्यांच्या या शक्तिप्रदर्शनाने विरोधकांनीही धसका घेतला. निवडणूकीसाठीचे पोषक वातावरण निर्मिती करण्यात आज तरी राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले. अर्थातच ही निवडणूक प्रतिष्ठेची आणि चुरशीची होईल अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सर्वत्र होत आहे.
अर्ज दाखल करताना माजी विधानपरिषद सभापती अरुण भाई गुजराथी, राष्ट्रवादीच्या महीला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, माजी मंत्री सतिश पाटील, जिल्हाध्यक्ष रविंद्र भैया पाटील, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक गफ्फार मलिक, ग्रंथालय सेल प्रदेश अध्यक्ष उमेश पाटील, काँग्रेस चे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, माजी नगराध्यक्षा जयश्री अनिल पाटील, तिलोत्तमा पाटील, रिटा बाविस्कर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, बाळू पाटील, मुख्तार खाटीक, विनोद कदम, सुनिल शिंपी, दर्पण वाघ आदि असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपकडून दोन वेळा उमेदवारी करून अनिल दादा यांना पराभवास सामोरे जावे लागले होते. त्यानंतर पक्षांतर्गत मतभेदातून त्यांनी भाजप मधून बाहेर पडत राष्ट्रवादीत प्रवेश केला. झालेल्या पराभवाने खचून न जाता त्यांनी पाच वर्ष मतदार संघातील पराभवाची कारणे तपासून पुन्हा एकदा उभारी घेतली आहे. पुन्हा सर्वानी एकत्र यावे व परकीय शक्तींना रोखावे, यासाठीच या भव्य रॅलीत विजयाचे स्वरुप प्राप्त झाले होते. तालुक्यातील मतदारांचा मोठा आत्मविश्वास वाढला असल्याचेही राष्ट्रवादीच्या सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे सध्या भाजपात असलेले कृषीभूषण माजी आमदार साहेबराव पाटील देखील उत्स्फूर्तपणे रॅलीत सहभागी झाले होते. त्यामुळे आता ते भाजपचे की राष्ट्रवादीचे ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यांच्या या भूमिकेने अनेक प्रश्न उभे केले आहेत.