
अमळनेर : नुकतीच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 125 जागांची यादी जाहीर केली आहे. त्यात अमळनेर विधानसभेचे तिकीट विद्यमान व भाजपचे सहयोगी आमदार शिरीष चौधरी यांना देण्यात आले आहे. यामुळे विधानपरिषद आमदार स्मिता वाघ काय भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष आहे. वाघ यांच्या समर्थकांसाठी हा मोठा धक्का असून कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. अमळनेरात अपक्ष निवडणूक लढविलेल्या उमेदवारांना मतदारांनी नेहमीच संधी दिलेली आहे. यावेळी मात्र वाघ बंड पुकारण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाल्यास आमदार चौधरी समर्थकांना निवडणूकीत मोठी कसरत करावी लागणार आहे.
लोकसभा निवडणूक वेळी देखील स्मिता वाघ यांचे नाव पुढे असतांना भाजप पक्षश्रेष्ठींनी उन्मेष पाटलांना संधी देवून यशस्वी खेळी केली होती. स्मिता वाघ यांना उमेदवारी मिळावी म्हणून त्यांचे समर्थक काल मुंबई येथे ठाण मांडून होते. तसेच जामनेर येथे नामदार गिरीष महाजन यांच्या कडे ही त्यांचे समर्थक रवाना झाले होते. पुन्हा एकदा खेळी झाल्याने वाघ समर्थक भाजपला आपली ताकद दाखविल्याशिवाय राहणार नाहीत. नगरपालिका निवडणूकीत स्थानिक उमेदवार असावा म्हणून अनेकांनी आपली ताकद पणाला लावून आपले स्वप्न पूर्ण केले. त्याचीच पुन्हा पुनरावृत्ती या विधानसभा निवडणूकीत बघायला मिळेल असे चित्र आहे.