आजच्या तरुणांना गांधी विचारधाराच राष्ट्राचा जबाबदार नागरिक बनवू शकते – दर्शना पवार

अमळनेर : आजच्या तरुण पिढीला गांधी विचारधारा संस्कारित करून राष्ट्राचा एक जबाबदार नागरिक बनवू शकते असे विचार परमपूज्य साने गुरुजी स्मारकाच्या कार्यवाह व स्त्री चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्या दर्शना पवार यांनी व्यक्त केले. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने रोटरी हॉलमध्ये आयोजित केलेल्या अभिवादन सभेत प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या.

व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष मकसूदभाई बोहरी, प्रताप महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. अरविंद सराफ, राजेंद्र सुतार, विजयकुमार पारख, अँड. भारती अग्रवाल, योगेश पाने होते.

श्रीमती पवार पुढे म्हणाल्या की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जीवन प्रवास साधा सोपा व सर्व परिचित आहे. आजची पिढी सक्षम, समृद्ध व संस्कारित घडवायची असेल तर भारतीय समाज व्यवस्थेला महात्मा गांधींच्या विचारसरणीची गरज आहे. आज धकाधकीच्या जीवनात गाडी, बंगला, पैसा हे अंतिम सत्य नाही तर संस्कारित पिढी कशी घडेल यावर आपण भर देणे हे अंतिम सत्य आहे. त्यांनी संस्कार, मुलींचे शिक्षण, रूढी परंपरा, राग, लोभ, मत्सर, खोटेपणा अशा मुद्द्यांवर स्पष्टीकरण केले व पालकांनी सदैव जागरूक, साक्षर आणि स्वतः संस्कारित राहावे असे सांगितले. राष्ट्रपिता महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, परमपुज्य साने गुरुजी ही भारतातील मोठी ज्ञानाची व्यासपीठे आहेत. ही ज्ञान समृध्दी प्रत्येकाच्या घरात येणे ही खरी काळाची गरज आहे. शिकलेली आई संपूर्ण घरादाराला पुढे नेते त्यासाठी मुलींचे शिक्षण झालेच पाहिजे परमपुज्य साने गुरुजींची आंतर भारतीची संकल्पना संपूर्ण भारतात राबविली गेली पाहिजे आंतर भारती या संकल्पनेत विविध राज्यातील विविध जाती धर्माचे तरुण-तरुणी एकत्र येणे त्यांच्या आचार विचारांचे आदान-प्रदान होणे ही खरी काळाची गरज आहे ज्या दिवशी साने गुरुजींच्या स्वप्नातील आंतर भारतीची संकल्पना पूर्ण होईल त्या दिवशी भारत नक्कीच जागतिक महासत्तेकडे जाईल. गांधीजींचे आध्यात्मिक क्षेत्रातून दोन वारसदार होते. एक आचार्य विनोबा भावे दोन परमपुज्य साने गुरुजी. गांधीजींच्या विचारसरणीवर त्यांनी आपल्या जीवनाचा मार्ग निवडला होता. तरुण पिढीमध्ये गांधी असेल तर पालक व पाल्य यांनी सामुदायिक जबाबदारी स्वीकारून राष्ट्राची जडण-घडण करणे आवश्यक आहे.

याप्रसंगी अमळनेर येथील गुजराती महिला मंडळाच्या माजी अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या करुणा सोनार यांच्या नेतृत्वाखाली सत्तावीस महिलांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत येथे महिला सदस्य म्हणून प्रवेश केला. त्यानिमित्त त्यांचे व त्यांच्या संपूर्ण टीमचे मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय तालुका संघटक राजेंद्र सुतार यांनी केला. सूत्रसंचालन योगेश पाने यांनी तर आभार प्रदर्शन विजय शुक्ल यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनील वाघ, ताहा बुकवाला, खदिर सादिक, जयंतीलाल वानखेडे, हेमंत भांडारकर, अँड.कुंदन साळुंखे यांनी प्रयत्न केले. महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना सभागृहात विनम्र अभिवादन करण्यात आले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!