अमळनेर : तालुक्यातील देवगांव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूल मध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करतांना महात्मा गांधींचे आचार-विचार कृतिशील मानवतावादी चळवळीचा केंद्रबिंदू होता. गांधीजींचे विचार तरुण पिढीने अंगीकारले पाहीजेत असे मत हायस्कुलचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले. याप्रसंगी जेष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के, एस.के.महाजन, एच.ओ.माळी, लिपीक एन.जी.देशमुख व्यासपीठावर होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.
ते पुढे म्हणाले की, आपली मानवतावादी तत्वे समाजाच्या प्रत्येक अंगात लागू करण्यासाठी गांधीजींनी आयुष्यभर अविश्रांत परिश्रम घेतले. भारतासारख्या बहुसांस्कृतिक देशात फक्त स्वतंत्र चळवळ करून चालणार नाही तर स्वतंत्र चळवळीला अन्य परिवर्तनवादी चळवळीची जोड द्यायला हवी तरच भारतीय समाजात मूलभूत परिवर्तन येऊ शकते अशी गांधीजींची धारणा होती. म्हणून गांधीजींचे विचार तरुण पिढीने अंगीकारले पाहीजेत.
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून शाळेचे शिक्षक विद्यार्थ्यांनी जयंतीच्या आदल्या दिवशी शाळेच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविले. परिसरातील कचरा व प्लास्टिक गोळा करून त्याचा नायनाट केला. शाळेत वकृत्व स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले होते. परीक्षक म्हणून अरविंद सोनटक्के, एच.ओ.माळी यांनी काम पाहिले. शाळेतील इयत्ता आठवी ते दहावीच्या २५ विद्यार्थ्यांनी वकृत्व स्पर्धेत सहभाग घेतला, यातील पहिल्या पाच विद्यार्थ्यांना शाळेचे उपक्रमशील शिक्षक आय.आर महाजन यांच्याकडून वाचनीय पाच पुस्तके मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आली. यात प्रथम खुशी डांगे, द्वितीय यशस्वी पाटील, तृतीय नेहा पाटील, उत्तेजनार्थ नंदीनी डांगे, अश्विनी महाजन यांचा समावेश आहे. यावेळी शाळेचे शिक्षकांनीही महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आय आर महाजन यांनी केले. तर आभार प्रदर्शन एस के महाजन यांनी केले यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.