अमळनेर : येथील छत्रपती शिवाजी नाट्यमंदीरासमोर राहणार्या हेमंत सोनार यांची बारा वर्षांची चिमुकली मानसीचा डेंग्यूच्या आजाराने बुधवारी मृत्यू झाला. या घटनेस नगर पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा ठपका ठेवत शहरातील नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
काही दिवसांपूर्वी मानसीला डेंग्यूची लागण झाली होती. तिच्यावर डॉ. अक्षय कुलकर्णी यांच्याकडे प्राथमिक ऊपचार केले. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने पुढील उपचाराकरिता तिला नाशिक येथील वोक्हार्ट रुग्णालयात दाखल केले होते. तेथे मात्र उपचारा दरम्यान तिचा मुत्यू झाला. मानसीच्या मृत्यूने तिच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. ती सचिन ड्रेसेसचे हेमंत सोनार यांची मुलगी असून तिचे पश्चात १ भाऊ, आई वडील, २ काका, आजी असा परिवार आहे.
अमळनेर स्वच्छ-सुंदर शहर असल्याचा आव आणणाऱ्यांनी आता विचार करण्याची वेळ आली आहे. शहरातील अस्वच्छता, खुल्या भुखंडांवरील दलदल, काटेरी झुडपे आणि त्यात निर्माण होणारे विविध किटक यांनी शहराला वेढा घातला आहे. प्रभागांमध्ये मुलभूत सेवासुविधा दिल्या जात नाहीत. सुविधा पुरविणे ही पालिकेची जबाबदारी आहे. झालेल्या प्रकारातून पालिका प्रशासनाने जागे व्हावे व नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात.