अमळनेर : आज काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अॅड. ललिता पाटील यांनी ना. गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत जामनेर येथे झालेल्या मेळाव्यात भाजपमध्ये प्रवेश करुन कमळ हाती घेतले. यावेळी अमळनेरचे विद्यमान आमदार व विधानसभेचे भाजपा उमेदवार शिरीष चौधरी, आमदार स्मिताताई वाघ उपस्थित होते. श्रीमती पाटील यांच्या या प्रवेशामुळे अमळनेर मतदार संघातील राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मतदार संघात काॅंग्रेस व राष्ट्रवादी आघाडीची युती असून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी अनिल भाईदास पाटील यांना जाहीर झाली आहे. निवडणूकीच्या तोंडावर काॅंग्रेसने साथ सोडल्याने राष्ट्रवादीला त्याचा मोठा धोका होईल. जामनेर येथील या मेळाव्यात जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अॅड. ललिताताई पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव पराग पाटील, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल माळी, युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव हर्षल जाधव, ब्राह्मणे गावाचे उपसरपंच प्रकाश पाटील, वाघोदा येथील ग्रा. पं. सदस्य राहुल पाटील, प्रसाद कापडे, भुषण पाटील, धनराज पाटील, वसंत पाटील, जगदीश पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
काही दिवसांपूर्वी अमळनेर येथील मराठा मंगल कार्यालयात माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात अॅड. ललिता पाटील यांनी कोणीही ईकडे तिकडे उड्या मारु द्या, मी काॅंग्रेस पक्षातच राहणार असल्याचे विधान केले होते. मात्र अचानकपणे त्यांनी केलेला भाजप प्रवेश विचार करायला लावणारा आहे.