धुळे : शहरात चांगली लढत देवू शकतील असे माजी आमदार शरद पाटलांना ऐनवेळी सेनेकडून डावलण्यात आले. यामुळे त्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेवून आपण शिवसेनेच्या सर्व पदांचा राजीनामा उद्धव ठाकरेेंकडे इमेलने पाठविला असून आता मी कुठल्याही पक्षात नाही, हे जाहीर केले. आता ते पुढे नेमकी काय भुमिका घेतात ? याकडे धुळेकर मतदारांचे लक्ष लागून आहे. काही काळ ते उत्तराची वाट पाहतील व त्यानंतर लवकरच त्यांची पुढची भूमिका ठरेल. सेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. माजी आमदार व जिल्हा बँक अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे आणि माजी आमदार अनिल गोटे ही नावे चर्चेत असून त्यांच्याच ताकदीचा उमेदवार म्हणून माजी आमदार शरद पाटील यांचेकडे पाहिले जाते.
अनिल गोटेंना भाजपाने पक्षातून काढून टाकले आहे. तर आता सेनेच्या तिकीटाची चर्चा संपली आहे. त्यामुळे गोटे हे त्यांच्या लोकसंग्रामच्या माध्यमातूनच लढतील अशी चर्चा आहे. अपक्ष उमेदवार म्हणून भाजपातून बाहेर पडलेल्या डाॅ. सौ. माधुरी बाफना यांचे नाव पुढे आहे. याशिवाय माजी आ.राजवर्धन कदमबांडे भाजपाकडे जाण्यास उत्सुक असल्याचे कळते. त्यांचा भाजपा प्रवेश न झाल्यास त्यांनी अपक्ष निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह सुरु आहे. या पार्श्वभूमीवर कदमबांडे अपक्ष उभे राहिले तर समाजातील सर्व स्तरातून त्यांना जोरदार समर्थन मिळू शकते. भाजपाचे तिकीट जाहीर झाल्यावर समीकरण बदलेल. मतदार संघात प्रा.शरद पाटील यांची कारकीर्द लक्षात घेता तेदेखील अपक्ष निवडणूक लढविण्याची शक्यता नाकारता येत नाही.