अंबर्षी टेकडी वरील वनराई पुन्हा संकटात

विघ्नसंतोषींचा महिनाभरातील हा चौथा प्रकार

अमळनेर : येथील चोपडा रोडवर असलेल्या अंबर्षी टेकडी वरील वनराईला पुन्हा एकदा विघ्नसंतोषींनी आग लावली. शहराच्या सौदर्यात भर घातलेल्या या टेकडीला आग लागल्याचे आज पहाटे टेकडीवर व्यायामासाठी येणाऱ्यांना लक्षात आल्याने त्यांनी तातडीने नगरपालिकेच्या अग्निशमन विभागास कळविले. अग्निशमन विभागाच्या बंबने तात्काळ परिसरातील आग आटोक्यात आणली गेली. आग विझविण्याकामी नितीन खैरनार, दिनेश बिऱ्हाडे, फारुख शेख, आनंदा धनगर यांनी मदत केली. गेल्या महिनाभरातील हा चौथा प्रकार असल्याने साहजिकच टेकडी वरील वनराई पुन्हा संकटात सापडली आहे.

अनेक वर्षापासून टेकडीवर श्रमदानातुन वृक्ष लागवड करुन वनराई तयार केली जात आहे. टेकडी वर नियमीत येणारे लोक व टेकडी गृपच्या माध्यमातून वृक्ष लावून जगवण्यासाठी मेहनत घेतली जात आहे. प्रत्येक वृक्षापर्यत पाणी पोहचविण्यासाठी दररोज सकाळी टेकडी गृपचे प्रयत्न सुरुच आहेत. मध्यंतरीच्या काळात टेकडीवर समाजकंटकांनी कचरा केला होता. हा कचरादेखील काढून टेकडी ग्रुपच्या माध्यमातून स्वच्छता करण्यात आली होती. आग लावण्याचे प्रकार सातत्याने होत असल्याने शहराच्या सौंदर्यासह खुप मोठे नुकसान होत आहे. विघ्नसंतोषी लोकांचा बंदोबस्त होणे गरजेचे झाले आहे. तसे न झाल्यास संपूर्ण वनराई नष्ट होईल. एव्हढेच नव्हे तर जवळच असलेले जल शुध्दीकरण केंद्र व घनकचरा प्रकल्पाला फटका बसू शकतो. निसर्ग प्रेमींनी या घटनेचा जाहीर निषेध केला असून या ठिकाणी त्वरीत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत व दोषींना शोधून त्यांचेवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. अग्निशमन विभागाच्या तात्काळ लक्ष घातल्याने होणारा अनर्थ आटोक्यात आला. निसर्ग प्रेमींनी नगरपालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!