शाळेने बांधलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा साहित्याने सुसज्ज अशा इंडोअर हॉलचेही उद्घाटन
अमळनेर : येथील पी.बी.ए. इंग्लिश मिडियम स्कूल चे ४२ वे दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन खा.शि.मंडळाचे सर्व सन्माननीय संचालक मंडळाच्या उपस्थितीत नुकतेच उत्साहात संपन्न झाले. शाळेचे माजी विद्यार्थी व सध्या सँमसंंग मोबाईल कंपनीत हैद्राबाद यूनिट मध्ये प्रमुख इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेले अमित जैन स्नेहसंमेलनाचे आमंत्रित प्रमुख पाहुणे होते. कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन प्रदीप अग्रवाल, शाळेचे चेअरमन डॉ. संदेश गुजराथी, उपाध्यक्ष कमलजी कोचर, माधुरी पाटील, डॉ. बी. एस. पाटील, योगेश मुंदडे, नीरज अग्रवाल, हरी भिका वाणी, जितेंद्र एम.जैन, विश्वस्त वसुंधरा लांडगे, चिटणीस डॉ. ए.बी.कोचर उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.
आपल्या भाषणातून अमित जैन यांनी शाळा व शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जीवनातील सर्व यशस्वीतेचे श्रेय त्यांनी आपल्या शाळेला, गुरुजनांना दिले. आपण या सर्वांसमोर नतमस्तक होऊन त्यांचे खूप खूप आभार मानतो अशा भावना प्रकट केल्या. त्यानंतर इयत्ता दहावीत प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केलेले विद्यार्थी कु.शितल पाटील व कु. प्रथम माळी यांचा स्मृतिचिन्ह व रोख बक्षीस देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. सकाळच्या सत्रात विविध बहुरंगी व कलागुणांना वाव देणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात रांगोळी स्पर्धा, फ्लॉवर डेकोरेशन, बिस्किट डेकोरेशन स्पर्धेचे तर संध्याकाळच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद नोंदविला.
कार्यक्रमाचे नियोजन व आखणी व शिस्तबद्ध संचलन शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.देवरे, पर्यवेक्षिका एम. एस. बारी व सी.सी.ए.कमिटी यांच्या वतीने सदर मूर्त रूप दिले जात असते. एक आनंदाची पर्वणी व आनंद रुपी वातावरण या कालखंडात पहावयास मिळत असते. त्याच सोबत ‘आर्ट गॅलरी’ ही संकल्पना कलाशिक्षक प्रशांत मालुसरे राबवित असतात. त्यामध्ये शाळेच्या कालखंडात काढले गेलेले चित्रांचे संकलन केले जाते. या आकर्षक चित्रांची प्रदर्शनी आयोजित केली जाते. त्याच सोबत शाळेच्या गणित शिक्षिका अश्विनी चौधरी यांनी गणित निबंध स्पर्धेत महाराष्ट्रातून तृतीय क्रमांक प्राप्त केला याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात सत्कार आला.
दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात शेलापागोटे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संध्याकाळच्या सत्रात शाळेने बांधलेला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा साहित्याने सुसज्ज अशा इंडोअर हॉलचे उद्घाटन महाराष्ट्र विधानपरिषदेचे आमदार स्मिताताई वाघ व खा.शि. मंडळातील संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. विद्यार्थ्यांना खेळाप्रती आवड निर्माण व्हावी व सदृढ जीवन प्राप्त व्हावे हा उदात्त हेतू या माध्यमातून जोपासण्याचा प्रयत्न शाळा करीत आहे. त्याच सोबत मान्यवरांच्या शुभहस्ते मिस पी.बी.ए. म्हणून कु.रक्षिता शर्मा, मास्टर पी.बी.ए. म्हणून कनिष्क साळुंखे यांना गौरविण्यात आले. स्मार्ट बॉय म्हणून चि. प्रितेश मगरे व स्मार्ट गर्ल म्हणून कु. सुचिता यादव यांना गौरविण्यात आले. दुसऱ्या दिवसाच्या सत्राचे खास आकर्षण म्हणजे तानाजी मालुसरे यांच्या जीवन गौरवाची यशस्वी गाथा मांडणारे महानाट्य सादरीकरण करण्यात आले. रोमहर्षक व आकर्षक पद्धतीने हे महानाट्य प्रस्तुत केले. ‘सख्खी बायको मेली’ या विनोदी नाट्याने तर प्रेक्षकांची हसून मनसोक्त करमणूक केली. संध्याकाळच्या सत्रात मुख्याध्यापक सरांनी वार्षिक शालेय अहवाल सादर केला. सदर कार्यक्रमासाठी शाळेचे चेअरमन डॉ. संदेश गुजराथी, मुख्याध्यापक जे.एस. देवरे, पर्यवेक्षिका एम. एस.बारी, व्ही.पी.बडवे, सुचेता वैद्य, महेश माळी, एस.एन. शहा, व्ही.जी. बोरोले, प्रशांत मालुसरे, टी.एच.बग्गा, शितल कुलकर्णी, वैशाली भोळे, एस.पी. पाटील, प्रशांत वंजारी, अशोक महाजन, श्रावण पाटील, प्रविण कार्लेकर व समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे सहकार्य लाभले.