खान्देश कवींनी विनोदी शैलीत प्रेक्षकांना केले हास्यात लोटपोट; सभागृह हाऊसफुल्ल

शिवशाही फौंडेशन व खान्देश साहित्य संघ, जळगाव यांचा संयुक्त उपक्रम

अमळनेर : येथील शिवशाही फौंडेशन व खान्देश साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जी.एस. हायस्कूल मधील आय.एम.ए सभागृहात अहिराणी व मराठी हास्य कवी संमेलन पार पडले. संमेलनात प्रेमाचा जांगडगुत्ता फेम नारायण पुरी (तुळजापूर), सामाजिक दंभस्फोटक कवी भरत दौंडकर (पुणे) यांच्यासह खान्देशातील कवींनी विनोदी शैलीत कोटी करत प्रेक्षकांना हास्यात लोटपोट केले. यावेळी शेतीमातीच्या, राजकीय, सामाजिक आणि हास्य विडम्बनात्मक कविता सादर करण्यात आल्या. सभागृह खच्चून भरले होतेच शिवाय काही प्रेक्षक खाली गाद्या टाकून बसले होते. कवी संमेलनाचे उद्घाटन तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. शिवशाही फाऊंडेशनचे अध्यक्ष जयेशकुमार काटे, शिक्षक नेते बिपीन पाटील प्रमुख पाहुणे होते.

कवी नारायण पुरी यांनी “काटा” या कवितेतून “पायमंदी सडतो गं, सखे बोरातीचा काटा, तुझ्या पायातली सल त्यात माझा निम्मा वाटा” या ओळीतून पती पत्नी जीवन रथाची दोन चाके असल्याचे दाखवून दिले . त्यांच्या सुप्रसिद्ध ‘प्रेमाचा जांगडगुत्ता’ या कवितेेेला प्रचंड दाद मिळाली. प्रसिद्ध विडंबन कवी भरत दौंडकर यांनी “कितीही पांघरला राम, तरी झाकून ठेवता येत नाही आत्म्यातला आसाराम” या कवितेतून साधू संतांचे थोतांड वर टीका केली. त्यांनी “गुंठा गुंठा जमीन विकून.. आज गोफ आली गळ्यात, एक प्लेट मातीचा वास हुंगायला.. उद्या रक्त येईल डोळ्यात” या कवितेतून शेतकऱ्याच्या काळ्या आईचे महत्व विशद केले.

कवयित्री प्रियंका पाटील (नवापूर) यांनी आपल्या ‘माझी माय’ या कवितेतून आईबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. तसेच त्यांनी डिजीटल युगाावर कविता सादर केली. कवी रमेश धनगर (गिरड) यांनी “गावमान गावामां जमनं मन्ह लगीन…मी तिन्हा लांडगा नी ती मन्ही वाघीन” या विनोदी अहिराणी कवितेने श्रोत्यांना लोटपोट केले. सामच्या वृत्त निवेदिका प्राची साळुंखे (चोपडा) यांनी आपल्या कवितेतून हिंगणघाट मध्ये घडलेला प्रसंग सांगत कवितेतून “तू करतो आहेस ते नक्कीच पाप आहे… जरा जपून, माझ्या पाठीशी उभा माझा बाप आहे…” या ओळी सादर करत सध्याच्या जगातील अन्याय अत्याचारावर प्रकाश टाकला. “खरे सांगते बाबा चूक नव्हतीच माझी काही, वेळच माझी खराब अंधारल्या दिशा दाही” या कवितेतून एका मुलीची वेदना कथन केली. प्रा.सदाशिव सूर्यवंशी (धुळे) यांनी “तुना साठे व सखी साजणी” ही अहिराणी कविता सादर केली. आणि मी पुन्हा येईन म्हणत राजकीय विडंबन काव्य सादर केले. कवी कुणाल पवार (लोंढवे) यांनी “मी पिनुका मंग ” ही विनोदी दारुबद्दलची कवितेने अनेकांची मने जिंकली. तर “बा विठ्ठला तू एकदा माझ्या बापाचीही जागा घेऊन बघ.. शेतकरी बनून तू ही फक्त…काही दिवस तरी राबून बघ” या कवितेतून शेतकऱ्यांची व्यथा मांडली. कवी शरद धनगर (करणखेडा) यांनी ‘प्रेम नी करम कहाणी’ या विनोदी कवितेतून एकतर्फी प्रेमविराची फजिती कथन केली त्यांनी अहिराणीत गझल सादर करून सर्वांना अचंबित केले.”ती दिखे जशी ऐश्वर्या, तिनं वय बी व्हतं सोया.. मी व्हतू साधा भोया, ती दि का माले टाया” अशा शब्दांत प्रेक्षकांना लोटपोट केले. कवी अविनाश भारती यांनी ‘तुकारामाचे कोडं’ यात “तुझी गाथा सोलून टाकणाऱ्यांना.. तुला संपवता आलं नाही तुका… तू जिवंत कसा आहेस.. यायचं कोडं पडलंय त्यांना” या कवितेने श्रोत्यांची मने जिंकली. दरम्यान नारायण पुरी आणि भरत दौंडकर यांच्या चार चार ओळींनी श्रोत्यांना लोट पोट केले. सूत्रसंचालन शरद पाटील व उमेश काटे यांनी केले. आभार डी.ए.धनगर यांनी मानले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!