आज महाशिवरात्री पासून कपिलेश्वर महादेव मंदिर यात्रोत्सवास सुरुवात

अमळनेर : खान्देशातील तिर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र म्हणून ओळख असलेले तालुक्यातील नीम जवळील कपिलेश्वर महादेव मंदिर यात्रोत्सवास आजपासून सुरुवात झाली आहे. महाशिवरात्री पासून पंधरा दिवस हा यात्रोत्सव सुरू असतो. जळगाव व धुळे जिल्ह्याच्या सीमारेषेवर असलेले श्री क्षेत्र कपिलेश्वर महादेव मंदिर हे खान्देशातच नव्हे तर भारतात सर्वत्र परिचयास आले आहे. मंदिराला एक हजार वर्षापूर्वीचा इतिहास असून अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचे बांधकाम केले आहे. मंदिरात तीन शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे. राज्यातील काना कोपऱ्यातुन भाविकांची गर्दी होऊ लागल्याने परिसराला महत्त्व प्राप्त झाले आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूला तापी, पांझरा आणि गुप्तगंगा असलेल्या त्रिवेणी संगमावर सुमारे एक हजार वर्षांपूर्वी ऋषी कपिल मुनींनी तपस्या करीत शिवलिंगाची स्थापना केली आहे.

तिर्थक्षेत्र विकास निधी पासून वंचितच

श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिराला तिर्थक्षेत्र व पर्यटनस्थळाचा दर्जा  मिळाला असल्याचा नुसताच गाजावाजा केला जातो. प्रत्यक्षात मात्र, आजतागायत मंदिराची जागा नावे नसल्याने शासनाकडून मिळणाऱ्या विकास निधी पासून तिर्थक्षेत्र वंचितच आहे. हंसानद महाराज व मंदिराचे विश्वस्त यांनी जळगाव, धुळे जिल्ह्यातून मदत मिळवित अनेक विकासकामे केली आहेत. सद्यस्थितित लोकवर्गणीतून भक्त निवासाचे काम सुरु आहे.

या मंदिराचे महत्व स्कंदपुराणातही सांगितले गेले असून याच ठिकाणी मंदिराचे मठाधिपती हंसांनंदजी महाराज यांनी सन २००५ साली अखिल भारतीय संत संमेलन भरविले होते. त्यावेळी भारतातुन अनेक संतांनी हजेरी लावल्याने तेथील भूमी पावन झाली आहे. अध्यात्म आणि सामाजिकता यातून परिसरात कायापालट झाला असून मंदिराला लागूनच अनिरुद्ध बापूंचा आश्रम आहे. याठिकाणी दर शनिवारी व रविवारी मुंबई, पुणे, नाशिकसह महाराष्ट्रातून भाविक येत असल्याने या निसर्गाच्या सानिध्यात भाविकांची मांदियाळी नजरेस पडत आहे. याच ठिकाणी मठाधिपती हंसांनंद महाराज यांनी लहान बालकांसाठी वेधशाळा सुरू केली असून शालेय शिक्षणाबरोबर त्यांना अध्यात्माचे धडे दिले जात आहेत. मंदिरावर वर्षभर धार्मिक, सामाजिक कार्यक्रम सुरू असतात. तर महाशिवरात्रीला मोठा यात्रोत्सव भरविला जातो. वर्षभर या देवस्थानच्या दर्शनासाठी भाविक येत असतात. यात्रोत्सवासाठी पाळणा, उपहारगृहे, संसार उपयोगी वस्तू, खेळणी आदी दुकाने थाटली आहेत. अमळनेर एस.टी. आगारातून भाविकांसाठी जादा एस.टी.बसेसची सोय केली आहे. मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीसांचा चोख बंदोबस्त आहे. खान्देशातील प्रसिद्ध असलेले या मंदिरावर नवस फेडण्यासाठी नेहमीप्रमाणे भाविक दाखल झाले असून दर्शनासाठी गर्दी होऊ लागली आहे. भाविकानी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिराचे मठाधिपती हंसानंद महाराज व मंदिराचे विश्वस्त यांनी केले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!