सिंचनाला प्राधान्य देत पाडळसरे प्रकल्प पाच वर्षाच्या आत पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करणार : भूमीपुत्र आमदार अनिल पाटील

सर्वपक्षीय सत्कारावेळी कृषीभूषण साहेबराव पाटील व आमदार स्मिताताई वाघ यांच्या अनुपस्थितीने साशंकता

अमळनेर : तालुक्यातील भूमीपुत्रांनी माझ्यासारख्या फाटक्या भूमीपुत्राच्या झोळीत भरभरुन दान टाकले. त्यांचा विश्वास सार्थ करण्याचे आश्वासन देत सिंचन क्षेत्राला प्रथम प्राधान्य देत पाडळसरे प्रकल्प पाच वर्षाच्या आत पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करणार अशी ग्वाही भूमीपुत्र आमदार अनिल पाटील यांनी दिली. येथील मराठा मंगल कार्यालयात काल ता.२२ रोजी सायंकाळी आमदार अनिल पाटील यांचा सर्वपक्षीय सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील होते. यावेळी व्यासपीठावर विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमाताई पाटील, जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई पाटील, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सुलोचनाताई पाटील, रंजनाताई देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय सेलचे उमेश पाटील, रिता बाविस्कर, योजना पाटील, चंद्रकांत (मुन्ना) शर्मा, गोकुळ बोरसे, डॉ.अनिल शिंदे, श्याम अहिरे, सचिन बाळू पाटील, मुख्तार खाटिक, शिवाजी पाटील, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष विजू मास्तर, प्रा.अशोक पवार, नगरसेवक मनोज पाटील, सुभाष चौधरी, डीवायएसपी राजेंद्र ससाणे, पोलीस निरिक्षक अंबादास मोरे, एस.एस.ब्रम्हे, प्रकाश पाटील, आशा चावरिया, अलका पवार, कविता पवार आदी उपस्थित होते. संपूर्ण सभागृहात व बाहेर चाहत्यांची गर्दी होती. मात्र..सर्वपक्षीय सत्कारावेळी माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील व आमदार स्मिताताई वाघ यांच्या अनुपस्थितीने साशंकता निर्माण झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल शिसोदे यांनी केले.

अरुणभाई गुजराथी यांनी विधानसभा निवडणूकीवेळी जाहीर प्रचार सभेत अमोल मिटकरी काय म्हणाले याची आठवण करुन दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी जशी आग्राहून सुटका करुन घेतली तशीच सुटका आमदार अनिल पाटलांनी दिल्लीहून करुन घेतल्याचे ते म्हणाले. रविंद्र भैय्या यांनी पाडळसरे धरण व्हायलाच पाहिजे, उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित होण्यासाठी प्रयत्न हवेत असे सांगितले. यावेळी पुष्पलताताई पाटील यांनी रहदारीसाठी पैलाड ते विश्रामगृह उड्डाणपुलासाठी प्रयत्न व्हायला हवेत असे सांगितले. शिवसेनेचे तालुकाध्यक्ष विजू मास्तर यांनी आम्ही युतीत असल्याने भाजपासोबत काम करत होतो मात्र काय करत होतो हे आम्हालाच माहीत असे सांगितले. चंद्रकांत (मुन्ना) शर्मा, श्याम अहिरे, तिलोत्तमाताई पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

सत्कारमूर्ती आमदार पाटील म्हणाले, माझी दिल्ली वारी राष्ट्रपती राजवट उठविण्यासाठीच होती असा खुलासा केला. आमचं जे ठरलं होतं ते घडलं. यात स्व.उदय वाघांचं नाव घेत गेली पंधरा वर्षे त्यांनी ज्याप्रकारे काम केलं तसंच काम या निवडणुकीत त्यांनी केल्याचे उघड केले. मला निवडून आणण्यासाठी मत देणारेच नव्हे तर ज्यांनी मत दिले नाही त्या तळागाळातल्या सर्वांसाठीच मी काम करणार आहे. योगायोगाने अर्थ खाते, जलसंपदा खाते राष्ट्रवादीकडे असल्याने राष्ट्रवादीचा आमदार म्हणून पाडळसरे धरणाचा प्रश्न महत्वाचा असल्याने सिंचन क्षेत्राला प्रथम प्राधान्य देत पाडळसरे प्रकल्प पाच वर्षाच्या आत पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे भाषण संपल्यावर विविध संस्था, पदाधिकारी, संघटना, कार्यकर्ते यांचेकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.

खवशी ग्रामस्थांतर्फे सत्कार करतांना डॉ.शामकांत देशमुख, गजानन पाटील, कैलास पाटील, अरूण बापु देशमुख, संजय कापडे, संजय सूर्यवंशी, प्रसाद कापडे.

आवाहनाला जनतेने साथ देत भूमीपुत्राला निवडून दिले. आता.. आमदार अनिल पाटील हेच खरे परिक्षार्थी….

विधानसभा निवडणूकीवेळी अमोल मिटकरी जाहीर प्रचार सभेत म्हणाले होते की, सत्ताधारी पक्षाचे जिल्ह्यातील आमदार, खासदारच नव्हे तर जलसंपदा मंत्री असतांना देखील पाडळसरे धरणाचे काम एक इंचही होवू शकले नाही. बेरोेजगारी, गुंडागर्दी, महिलांवरील अत्याचार, शेतकरी आत्महत्या, अवैध धंदे, कर्जमाफी, सिंचन योजना असे किती तरी प्रश्नांचा उलगडा केला होता. चित्रफीत द्वारे अवैध दारु, कापूस भाव वाढ उपोषण, पतंजली रुई बत्ती सारखे मुद्दे जनतेच्या निदर्शनास आणून दिले होते. स्थानिक आमदारांनी अमळनेर शहर बिकानेर करुन, पाचशे रुपयाने मत विकत घेवून अमळनेर तालुक्याला कलंक लावला. तालुक्यात बेरोजगारी, गुंडागर्दी, दारु तस्करी, वाळू तस्करी वाढली. सरकारने कलम ३७० रद्द केले ते केंद्रात मात्र तो राज्यातील शेतकऱ्याच्या जीवनाशी निगडीत प्रश्न नाही. तसाच १५० कि.मी. वर राहणारा तुमचा नेता असूच शकत नाही. बाहेरच्या पार्सलला याच भूमीत गाडून भूमीपुत्र अनिल पाटील यांना निवडून द्या व अमळनेर तालुक्याला लागलेला हा कलंक पुसून काढा असे आवाहन केले होते. त्या आवाहनाला तालुक्यातील जनतेने साथ देत भूमीपुत्राला निवडून दिले. यामुळे साहजिकच.. आमदार अनिल पाटील यांची जनतेचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी वाढली आहे. तसे न केल्यास तालुक्यातील जनता या भूमीपुत्रालाही माफ करणार नाही.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!